Saturday, October 18, 2025
Happy Diwali

घटस्फोटातील नात्याची गोष्ट…!

घटस्फोटातील नात्याची गोष्ट…!

मी मागे माझ्या एका लेखामधे म्हटले होते की, राज्यनाट्य स्पर्धेमधील काही नाटके व्यावसायिक दर्जाची असतातच. त्याला फक्त व्यावसायिक रंगकर्मींचा हात लागला की, एक वेगळाच डोलारा प्रेक्षकांसमोर उभा रहातो; परंतु त्यावर व्यावसायिक संस्कार करणारा तांत्रिक, अचूक बुद्धिमत्तेचा अभ्यासक लागतो. त्यामुळे ‘गोष्ट तिच्या घटस्फोटाची’ हे नाटक नात्याची गोष्ट सांगण्यात जितके प्रभावी होते, तितकेच ‘वजनदार’ नावाचे नाटक हलके झालेले जाणवते. ही तुलना अशासाठी की, दोन्ही नाटके मागील वर्षीच्या राज्यनाट्य स्पर्धेतून आली आहेत. राजन ताम्हाणे यांनी घटस्फोटाच्या गोष्टीत अशी काही जान फुंकली आहे, की नात्यांच्या गोष्टीत डोळ्यांच्या पाणावलेल्या कडा या नाटकात बांध फोडून घळाघळा वाहू लागतात. याचा अनुभव मी स्वतः प्रयोगादरम्यान क्षणाक्षणाला घेत होतो.

गेल्या काही वर्षातील नाटकांच्या पद्धतींकडे पाहता कानेटकरी किंवा कोल्हटकरी लेखनशैलींचे एकमेव उदाहरण म्हणून या नाटकाकडे पाहावे लागेल. दोन्हीही नाटके बघितल्यामुळे नात्यांचा आणि घटस्फोटाचा तौलनिक संबंध येणारच, त्याला माझा नाईलाज आहे. (थोडक्यात असे म्हणायचेय की नात्याची गोष्ट आणि गोष्ट तिच्या घटस्फोटाची या दोन नाटकांची तुलना अगदी आपसूकपणे होणारच, त्याला माझा नाईलाज आहे.) मला वाटत नाही की या नव्या नाटकातील नटसंचाने आधीच्या नाटकांचे प्रयोग पाहिले असतील. कारण जेव्हा एखाद्या कॅरेक्टरच्या मॅनरीजमचा प्रश्न उभा राहतो, तेव्हा तो प्रश्न सोडवण्यासाठीची नटांच्या प्रक्रियेमध्ये भिन्नता आढळते. त्यामुळे व्यावसायिकतेतला मेलोड्रामा आणि अमॅच्युअरमधला भूमिका सटल पद्धतीने साकारायचा आत्मविश्वास हे दोन्ही परिणामकारक ठरतात. पण जास्त परिणाम अर्थातच व्यावसायिक ‘घटस्फोटाचा’ जाणवतो. एखाद्या अपत्यावर माता-पित्याच्या घटस्फोटामुळे झालेले मानसिक आघात आणि त्यातून निर्माण झालेल्या हक्क नामक प्रवृत्तीचे आचरण, अशा कौटुंबिक पाकात घोळवलेली ही मिठाई आहे. मिठाई अशासाठी की कुटुंबाने एकत्रितरीत्या पाहण्याची नाटकेच लोप पावत चालली आहेत. आईबाबांबरोबर दर दिवाळीत पाहिलेले नाटक अजूनही आठवणीत आहे.

अशी नाटकं निर्माण होणं बंद झालं आणि ते कौटुंबिक नाटकाचं युगच संपुष्टात आलं. हे पाल्हाळ लावण्याचं कारण एकच, नाटकांच्या नावावरून अंदाज लावणाऱ्या अदमासपंचे प्रेक्षकांचा भ्रमनिरास या नाटकाबाबत झाल्या वाचून राहणार नाही. नाटक सुरू होते, ते एका संथ लयीने. पूर्वार्धातील बराच वेळ लेखकाने कॅरेक्टर डेव्हलपमेंटसाठी घेतलाय. पण जसा विनयचा प्रवेश होतो, प्रेक्षकवर्ग किंचित सावरून बसतो आणि मग नाटक जो टेकऑफ घेते, तुम्ही मध्यांतरातही त्याच विचारात राहता. नातेसंबंधातला संघर्ष पावलांपावलांवर सापडतो. नरेश नाईकांची लेखणी ‘नात्याच्या गोष्टीत’ जेवढी तीक्ष्ण भासली नव्हती, तेवढी या नव्या आवृत्तीमधे जाणवली. कदाचित या नाटकाचे पुनर्लेखन तरी झाले असावे किंवा कलाकारांच्या सादरीकरण प्रक्रियेमध्ये दिग्दर्शकाने अग्रेशन तरी पेरले असावे. विनयची भूमिका करणारा संग्राम समेळ जेव्हा एण्ट्री घेतो, तेच चौकार षट्कार ठोकण्याच्या आवेशात. नात्याची गोष्ट मधल्या विनयची भूमिका करणारा निलेश गोपनारायण सहजतेकडे, रिअलीस्टीक टेम्परामेंट असलेला होता. संग्रामचा विनय किंचित स्टाईलाईज्ड वाटतो. अर्थात यालाच आम्ही व्यावसायिकता म्हणतो. म्हणजे प्रचंड मानसिक चिडचिड झाल्यावर ताम्हाणेंचा आवाज चिरकायला लागतो. नैसर्गिक आवाज आणि इमोशनल आवाज यामधेही फरक दाखवून घालमेल, राग, चिडचिडेपण अंडरलाईन करता येते, हे त्यांच्यातला दिग्दर्शक कदाचित त्याना शिकवून जात असावा.

उरता उरली भूमिका आदिती देशपांडे यांची. कित्येक वर्षांनी मी त्यांना रंगमंचावर बघत होतो. आईच्या वाढलेल्या वयाचं अवडंबर न बाळगता त्या हे नाटक चोपतात. म्हणजे काही काही वेळा तर संग्राम विरुद्ध आदितीछोटी एक्स्प्रेशन्स त्या अशा काही उंचीवर नेऊन ठेवतात की मंचावर केवळ त्यांचाच वावर आहे की काय, हा प्रश्न पडतो. एखाद्या नटाने अवकाश व्यापणं म्हणजे काय, याचं उत्तर त्या सातत्याने देत राहतात. अर्थात या भूमिकेच्या अभ्यासात राजन ताम्हाणेंच दिग्दर्शकीय योगदान असणारच.

नेपथ्य ही अबोल बाजू पुन्हा संदेश बेंद्रे यांनी बोलकी केली आहे. हे नेपथ्य अक्षरशः मध्यमवर्गीय प्रेक्षकांना स्वतःच्या फ्लॅटमधे घेऊन जाते. संगीताची बाजूही जमेचीच आहे. बबडी, श्री, काऊन्सिलर(समुपदेशक) आणि वॉचमन अगदी समजून काम करतात. मला मात्र ‘नात्याच्या गोष्टीत’ल्या बबडीची म्हणजे धनश्री साटमची खूप आठवण येत होती. तर असा रंगरूप पालटून पेश केला गेलेला “घटस्फोटा”चा डाव अत्यंत व्यावसायिक स्वरूपात मांडल्याबद्दल निर्मात्या कल्पना विलास कोठारी यांना शुभेच्छा देणे क्रमप्राप्त आहे, कारण मागील किमान तीन तरी नाटकांमधे त्यांना आलेले अपयश बाजूला सारून पुन्हा नवा गडी, नवे राज्य ही व्यावसायिक भूमिका नक्कीच प्रशंसनीय आहे. तेव्हा हे कुटुंबासमावेत बघण्याचे नाटक आहे जेणेकरून या नाटकास प्रेक्षक लाभल्यास ‘नाटक’ जगेल, इतकेच…!  - भालचंद्र कुबल

Comments
Add Comment