
नवी दिल्ली : लडाख या केंद्रशासित प्रदेशातील हिंसेप्रकरणी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटकेत असलेल्या सोनम वांगचुकचे पाकिस्तान आणि बांगलादेश कनेक्शन असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात तपास सुरू असल्याची माहिती लडाखचे पोलीस महासंचालक एस.डी. सिंग जामवाल यांनी दिली. वांगचुक विरूद्धच्या तपासात आतापर्यंत जे काही आढळले ते सुरक्षेच्या कारणांमुळे सध्या सार्वजनिक करता येणार नाही. पण सोनमने मागील काही दिवसांत लडाखमध्ये अनेक चिथावणी देणारी भाषणं केली आहे. ही भाषणं आजही यू ट्युब तसेच इतर सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असल्याचे लडाखचे पोलीस महासंचालक एस.डी. सिंग जामवाल म्हणाले. लडाखमध्ये अशांतता निर्माण करणे या एकाच हेतूने वांगचुक काम करत होता, असेही जामवाल म्हणाले.
सोनम वांगचुक पाकिस्तान आणि बांगलादेशमधील विशिष्ट व्यक्तींच्या संपर्कात होता. लडाखमध्ये वांगचुकच्या नेतृत्वात सुरू असलेल्या कारवायांचे अहवाल नियमितपणे पाकिस्तान आणि बांगलादेशमधील विशिष्ट व्यक्तींकडे जात होते. त्याचे अनेक आर्थिक व्यवहार संशयास्पद आहे. यामुळेच सोनम वांगचुकच्या स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मुव्हमेंट ऑफ लडाख (एसईसीएमओएल) या संस्थेचे एफसीआरए लायसन्स (परकीय योगदान नियमन कायद्यांतर्गत दिलेला परवाना) केंद्रीय गृह मंत्रालयाने रद्द केले आहे. सरकारी यंत्रणा सोनम वांगचुकच्या आणि त्याच्या संस्थेच्या आर्थिक व्यवहारांचा कसून तपास करत आहे.
लडाख या केंद्रशासित प्रदेशाला भारतीय संविधानातील कलम सहा (आर्टिकल सिक्स) अंतर्गत स्वायत्त राज्याचा दर्जा द्यावा अशी मागणी करत सोनम वांगचुकने केंद्र सरकार विरोधात हिंसक आंदोलनासाठी चिथावणी दिली. यामुळे लडाखमध्ये हिंसा भडकली. या हिंसेत चार जणांचा मृत्यू झाला आणि ९० जण जखमी झाले. सार्वजनिक आणि खासगी संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कायदा सुव्यवस्था बिघडली. या सर्व गंभीर आरोपांतर्गत लेह पोलिसांनी कारवाई केली. हिंसक आंदोलनासाठी चिथावणी दिल्याप्रकरणी लेह पोलिसांनी सोनम वांगचुकला अटक केली. सोनम विरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.