पुढील तीन महिन्यांसाठी कंत्राटदारांची नियुक्ती
मुंबई : मुंबईतील वायू प्रदूषण आणि धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने रस्ते पाण्याने धुतले जात असून भविष्यात हिवाळ्यात पुन्हा निर्माण होणाऱ्या समस्येवर मात करण्यासाठी तीन महिन्यांकरता टँकरची सेवा घेतली जाणार आहे. त्यामुळे मुंबईतील ६७७ किलोमीटर लांबीचे ३७७ रस्ते हे टँकरच्या पाण्याने धुतले जाणार आहे. यासाठी सुमारे सात ते आठ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
मुंबईच्या पायाभूत सुविधा बळकट करून पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी मुंबईतील वाढते वायू प्रदूषण आणि धूळ प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी आणि रोखण्यासाठी तातडीने कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. मुंबईत बांधकाम आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये वाढ होत आहे. मुंबईतील बहुतांश प्रकल्प पुनर्विकासाचे आहेत. त्यामुळे धुळीचे प्रदूषण रोखण्याच्या उपाय योजनांपैकी एक उपाय म्हणजे सार्वजनिक रस्ते उच्चदाबाच्या पाण्याने स्वच्छ करण्यात येत आहेत. त्यामुळे शहर व उपनगरांची एकंदर स्वच्छता वाढण्यास मदत होत आहे.
मुंबईतील सुमारे ६७७ किलोमीटर लांबीचे ३७७ रस्ते स्वच्छतेसाठी निश्चित केले आहेत. हे रस्ते दररोज धुण्यात येणार असून, त्यासाठी ५ हजार लिटर क्षमतेचे टँकर आणि ९ हजार लिटर क्षमतेच्या टँकरची एकत्र मिळून दररोज सुमारे २५४ टँकरच्या मदतीने टँकर फे-यांची सेवा महापालिकेच्या ७ परिमंडळात घेण्यात येणार आहे. ही टँकरची सेवा तीन महिन्यांसाठी असेल. यामध्ये भाडेतत्वावर घेण्यात येणाऱ्या ५ हजार लिटर क्षमतेच्या एका टँकरच्या फेरीसाठी ४२०० ते ५००० रुपये तर ९ हजार लिटर क्षमतेच्या एका टँकरसाठी ६५०० ते ७२०० रुपये खर्च केले जाणार आहेत. ही टँकरची सेवा जेटिंग व्यवस्थेसह असेल, ज्यामुळे उच्च दाबाने पाण्याचा फवारा मारून रस्ते धुणे शक्य होईल असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
टँकर फेऱ्या आणि त्यावरील खर्च
परिमंडळ एक : (५००० लिटरचे: १२१५ टँकर, ९००० लिटरचे :२४३ टँकर)
पुरवठादार कंपनी : (इंझफ्रा ट्रान्सप्रोजेक्ट)
येणारा खर्च :५४.०६ लाख रुपये
परिमंडळ दोन : ( ५००० लिटरचे: १४५८ टँकर, ९००० लिटरचे: ४५० टँकर)
पुरवठादार कंपनी : लक्ष्य एंटरप्रायझेस
येणारा खर्च : ७५.६४ लाख रुपये
परिमंडळ तीन : (५००० लिटरचे: ४४६ टँकर, ९००० लिटरचे :४५० टँकर)
पुरवठादार कंपनी : एम एन एंटरप्रायझेस
येणारा खर्च : ४८.०१ लाख रुपये
परिमंडळ चार: (५००० लिटरचे :८९१ टँकर, ९००० लिटरचे: १०५३टँकर)
पुरवठादार कंपनी : अंशुमन अँड कंपनी
येणारा खर्च : १.२५ कोटी रुपये
परिमंडळ पाच: (५००० लिटरचे: ५६७ टँकर, ९००० लिटरचे: ४०५ टँकर)
पुरवठादार कंपनी : राम एन्विरो इन्फ्रा एलएलपी
येणारा खर्च : ५६.२२ लाख रुपये
परिमंडळ सहा: (५००० लिटरचे: ९७२ टँकर, ९००० लिटरचे: ३२४ टँकर)
पुरवठादार कंपनी : सनरेज एंटरप्रायझेस
येणारा खर्च : ७५.५६ लाख रुपये
परिमंडळ सात : (५००० लिटरचे :४८६ टँकर, ९००० लिटरचे: १३७७ टँकर)
पुरवठादार कंपनी : दिपक कन्स्ट्रक्शन
येणारा खर्च : १. १६ कोटी रुपये