Saturday, September 27, 2025

प्रभादेवी पूलबाधितांचे नजीकच्या परिसरातच होणार पुनर्वसन

प्रभादेवी पूलबाधितांचे नजीकच्या परिसरातच होणार पुनर्वसन

मुंबई : शिवडी ते वरळी उन्नत रस्ता प्रकल्पाअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या प्रभादेवी द्विस्तरीय पुलाच्या कामात बाधित होणाऱ्या दोन इमारतींमधील ८३ रहिवाशांसाठी अखेर म्हाडाने आसपासच्या परिसरातील ११९ घरे शोधली आहेत. या घरांची यादी नुकतीच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) सादर करण्यात आली आहे.

आता रहिवाशांच्या पसंतीनुसार घरे निश्चित करून त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. रहिवाशांच्या पसंतीनुसार ११९ पैकी ८३ घरे एमएमआरडीएला वर्ग करण्यात येणार असून यासाठी एमएमआरडीएकडून शीघ्रगणकाच्या ११० टक्के दराने रक्कम घेण्याचा म्हाडाचा प्रस्ताव आहे. अटल सेतूला जोडणारा शिवडी- वरळी उन्नत रस्ता प्रभादेवी पूल ओलांडून जात आहे. त्यामुळे जुना पूल पाडून त्याजागी नवीन द्विस्तरीय पूल बांधण्यात येणार आहे. जुन्या पुलाचे पाडकाम सध्या एमएमआरडीए करीत आहे.

या पुलाच्या कामात हाजी नुरानी आणि लक्ष्मी या दोन इमारती बाधित होत असून यात ८३ घरे आहेत. या ८३ रहिवाशांचे पुनर्वसन म्हाडाच्या घरात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. म्हाडाला पुनर्विकासाच्या माध्यमातून उपलब्ध झालेली घरे या रहिवाशांना कायमस्वरुपी दिली जाणार आहेत.

Comments
Add Comment