Friday, September 26, 2025

वेगवेगळ्या भूमिका करायला  मिळणे हाच टर्निंग पॉइंट

वेगवेगळ्या भूमिका करायला  मिळणे हाच टर्निंग पॉइंट

पुनीत वशिष्ठ स्वतःची ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरलेला आहे. ‘चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है’ या मालिकेमध्ये त्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ही मालिका सोनी वाहिनीवर आहे.

हिंदी चित्रपट सृष्टीतील कॉमेडियन ब्रह्मचारी यांच्या घरी जन्म झालेला मुलगा, मोठेपणी अभिनय क्षेत्रात येईल असे तेव्हा कुणाला ही वाटले नसेल. त्याचा जन्म मुंबईतील जुहूचा. सेंट जोसेस ही त्याची शाळा. शाळेत असताना तो स्पोर्ट्समध्ये होता, बॉक्सिंग करायचा. अभिनयामध्ये त्याचा सहभाग कमी असायचा.

त्याचे बारावीपर्यंतचे शिक्षण मिठीबाई कॉलेजमध्ये झाले. कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्याने जास्त भाग घेतला नाही. कारण तो त्यावेळी संगीतकार नदीम श्रवण यांच्या वाद्यवृंदामध्ये वादक म्हणून काम करायचा. संगीत त्याची आवड होती. शाळेय जीवनापासून तो काम करीत असल्याने पुढे त्याला जास्त शिक्षण घेता आले नाही.

तीन ते चार वर्षे वादकाचे काम केल्यानंतर, त्याने त्याचा मोर्चा नृत्याकडे वळवला. त्यावेळी नृत्य दिग्दर्शक अहमद खान त्याच्या ग्रुपसाठी नर्तक शोधत होते. तो त्याच्या ग्रुपमध्ये सामील झाला. ‘हिमालय पुत्र’ या चित्रपटासाठी त्या नृत्याच्या ग्रुपमध्ये तो होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक पंकज पराशर होते. त्यांनी पुनीतला ओळखले की, तो ब्रह्मचारीचा मुलगा आहे. त्यांनी त्याला या चित्रपटामध्ये अक्षय खन्नाच्या मित्राची ऑफर दिली.

‘चलो बुलावा आया है…’ या मालिकेमध्ये त्याची भूमिका कोणती आहे असे विचारल्यावर तो म्हणाला की, राजा वैरागीची भूमिका आहे, जो देवीचा भक्त आहे. त्या भक्तीचे रूपांतर अहंकारांमध्ये झालेले आहे. वास्तविक पाहता त्यांच्यामध्ये शालीनता यायला हवी. या अगोदर त्याने साकारलेली नारद मुनींची भूमिका गाजली होती.

या मालिकेचे दिग्दर्शक हेमंत प्रभू आहेत. हेमंतजी खूप सृजनशील दिग्दर्शक आहेत. कोणत्याही एका गोष्टीला ते चिटकून राहत नाही, पेपरवर जसे संवाद आहेत, तसेच असावे असा त्यांचा अट्टाहास नसतो. शूटिंगच्यावेळी मालिकेसाठी होणारे संवादातील चांगले बदल ते स्वीकारतात. मालिकेमध्ये नावीन्य आणण्याचा ते सतत प्रयत्न करीत असतात.

या मालिकेमध्ये पुनीतची निगेटीव्ह भूमिका आहे. यामुळे सहसा निगेटिव्ह रोल करणारा कलाकार अशी इमेज तयार होऊ शकते. पण पुनीतचे म्हणणे आहे की, आतापर्यंत मी ७५ मालिका व जवळपास २५ चित्रपट केले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना माहीत आहे की, मी नैसर्गिक अभिनय करणारा कलाकार आहे. मला वडिलांकडून अभिनयाचा वारसा मिळाला आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. प्रेक्षकांना ही भूमिका पाहून नक्की वाटेल की मी या भूमिकेमध्ये जीव ओतून काम केले आहे. ही भूमिका मी जगलो आहे. ते या मालिकेतील माझ्या व्यक्तिरेखेशी घृणा करतील, परंतु माझ्यावर प्रेम करतील. या मालिकेचे शूटिंग पूर्णपणे सिनेमासारखे झालेले आहे. या मालिकेतील राजा वैरागीला भक्तीचा अहंकार झालेला असतो. प्रेक्षकांनी तसा भक्तीचा अहंकार करू नये ही माझी अपेक्षा आहे. त्यांची देवावरची भक्ती पवित्र असावी.

जीवनात चढ-उतार खूप येतात, तसेच त्याच्या जीवनात टर्निंग पॉइंट आल्याचे त्याने म्हटले आहे. वेगवेगळी व्यक्तिरेखा साकारणे हे त्याच्या जीवनातील टर्निंग पॉइंट असल्याचे तो मानतो. पडता काळ पाहिल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून तो वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारीत आहे. ‘उदयपूर फाईल्स’ हा त्याचा अलीकडील रिलीज झालेला चित्रपट आहे, त्यातील त्याची निजामाची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. अगोदर एका मालिकेतील त्याची नारदाची भूमिका खूप गाजली होती. नारद मुनी, निजाम, राजा वैरागी या तिन्ही भूमिका प्रेक्षकांना आवडल्या. एका आगामी कन्नड चित्रपटामध्ये देखील तो काम करीत आहे. ईश्वराच्या कृपेने वेगवेगळ्या भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याचे तो मानतो व या बाबतीत तो ईश्वराचे धन्यवाद मानतो. -युवराज अवसरमल

Comments
Add Comment