
रूपेरी पडद्यावर सध्या ‘दशावतार’ या मराठी सिनेमाने जादू केली असल्याचे चित्र आहे. हा सिनेमा प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले असले, तरी या सिनेमाला रसिकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. याची कारणे वेगवेगळी असली तरी बऱ्याच कालावधीनंतर मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर गर्दी खेचत असल्याचे दिसून येत आहे. कोणत्याही सिनेमाची निर्मिती हे ‘टीमवर्क’ असले तरी त्याचे काही ‘यूएसपी’ असतात. ‘दशावतार’ या सिनेमाच्या विविध आकर्षणांपैकी एक म्हणजे दिलीप प्रभावळकर यांनी यात साकारलेली मध्यवर्ती भूमिका...! साहजिकच, त्यांचे चाहते सिनेमाला गर्दी करणार हे ओघाने आलेच आणि तसेच झाले सुद्धा...! पण मुळात हा सिनेमा बनवण्याच्या मागची भूमिका सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. पाया मजबूत असेल तर त्यावरची इमारत भक्कम असते आणि त्यानुसार हा सिनेमा मुळात लेखनात कसा उतरला, हे अधिक महत्त्वाचे ठरते.
‘दशावतार’ हा सिनेमा कोकणच्या मातीत रुजलेला आहे आणि त्याला कोकणातल्या ‘दशावतार’ या कलेची पार्श्वभूमी आहे. कोकणच्या मातीत आकार घेणारे हे कथासूत्र आहे. साहजिकच, अशा वेगळ्या शैलीचा सिनेमा कागदावर उतरला कसा आणि ती प्रक्रिया कशी होती, याची उत्सुकता वाटणे स्वाभाविक आहे. या सिनेमाचे लेखन व दिग्दर्शन हे दोन्ही, सुबोध खानोलकर या युवा रंगकर्मीने केले आहे. साहजिकच, त्याला या सिनेमातून जे काही सांगायचे आहे; ते तसेच्या तसे व अधिक प्रभावीपणे मांडणे त्याला शक्य झाले आहे.
या सिनेमाच्या लेखन प्रक्रियेपासून ते हा सिनेमा रुपेरी पडद्यावर येईपर्यंतच्या प्रवासाबाबत बोलताना सुबोध खानोलकर सांगतो, “लहानपणापासून कोकणातल्या गोष्टी, लोककला, दशावतार वगैरे मी पाहत होतो आणि नंतर स्वतः काम करायला मी सुरुवात केली. एकांकिका केल्या, नाटके केली आणि जेव्हा सिनेमाकडे वळायचे ठरवले; तेव्हा आपल्या मातीतला विषय घेऊन जगासमोर जायला पाहिजे, हे नक्की केले. त्यावेळी मला आजूबाजूला सारखे ऐकू येत होते की मराठी सिनेमात भव्यता नाही, दाक्षिणात्य सिनेमे खूप ग्रेट होत आहेत वगैरे. पण मला नेहमी वाटत आले आहे की मराठीत खूप चांगला आशय घेऊन सिनेमे येत आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीची सुरुवातच मराठी माणसाने केली आणि त्यानंतर मराठी माणसांच्या, मराठी दिग्दर्शकांच्या, मराठी कलाकारांच्या अनेक पिढ्या झाल्या; ज्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत मोठे योगदान दिले. सिनेमा लिहिताना मी हा विचार करत होतो की असे काय आहे; ज्याच्यामुळे मराठी सिनेमांकडे पाहण्याच्या दृष्टिकोन आपण बदलू शकू. मग माझ्या लक्षात आले की सिनेमाची भव्यता असे लोक जे म्हणतात, ती महाराष्ट्रातल्या निसर्गात आधीच आहे. मग हे जर आपल्याकडे आहे, तर मग आपण ते सगळ्या जगासमोर अभिमानाने का नाही दाखवायचे...?
दुसरे असे, की मराठी सिनेमाचे बजेट कमी असते म्हणून आपण आपला सिनेमा व्यवस्थित पोहोचवू शकत नाही वगैरे कारणे दिली जातात. मग मराठी सिनेमा हा जागतिक तोडीचा करण्यासाठी जे जे आपल्याला करणे शक्य आहे ते ते करण्याचा प्रयत्न करू, असे ठरवले. जर आपल्या मातीतली गोष्ट मराठी भाषेत सांगण्याची गरज असेल, तर तसाच सिनेमा व्हायला पाहिजे आणि मराठी भाषेतला सिनेमा हा जागतिक स्तरावर पोहोचला पाहिजे, असे मला वाटले. आपण जर उच्च कुवतीची गोष्ट सादर करू शकलो, तर मला असे वाटते की भाषेच्या पलीकडे जाऊन लोक सिनेमा पाहू शकतात. त्या दृष्टीनेच हा सिनेमा बनवण्याचे ठरवले. जगात कुठेही गेलो तरी भावभावना आणि रुढी-परंपरा सारख्याच असतात. त्यामुळे मला वाटले की या सिनेमाची गोष्ट युनिव्हर्सल आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच आम्ही हा सिनेमा रसिकांसमोर आणला आहे”. -राज चिंचणकर