Saturday, September 27, 2025

भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई, शनैश्वर विश्वस्त मंडळ बरखास्त; देवस्थानच्या चाव्या आता जिल्हाधिकाऱ्यांकडे

भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई, शनैश्वर विश्वस्त मंडळ बरखास्त; देवस्थानच्या चाव्या आता जिल्हाधिकाऱ्यांकडे

अहिल्यानगर : शनी पीडेचा त्रास होऊ नये यासाठी लाखो भाविक शनी शिंगणापूर येथे शनीदेवाच्या दर्शनाला येतात. पण या शनैश्वर विश्वस्त मंडळाने भ्रष्ट कारभाराचा कळस गाठला होता. अखेर फडणवीस सरकारने शनी शिंगणापूरचे शनी मंदिर विश्वस्त मंडळ बरखास्त केले. अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे प्रभारी अध्यक्ष करण्यात आले. लवकरच नवे विश्वस्त मंडळ स्थापन केले जाईल. तोपर्यंत जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली शनी शिंगणापूरच्या शनी मंदिराचा कारभार चालवला जाणार आहे. जिल्हाधिकारी मंदिराचे कामकाज बघणार आहेत.

बनावट मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने भाविकांना लुटणे, बोगस कामगार भरती असे अनेक गैरव्यवहार केल्याचा आरोप बरखास्त केलेल्या शनी मंदिर विश्वस्त मंडळाच्या पदाधिकार्‍यांवर आहेत. या प्रकरणी तपास सुरू आहे. शनिवार २७ सप्टेंबर २०२५ रोजी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी शनी देवाचे पूजन केले आणि मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे प्रभारी अध्यक्षपद स्वीकारले.

राज्याच्या विधी व न्याय विभागाने देवस्थान अधिनियम २०१८ अंतर्गत शनी शिंगणापूरचे शनी मंदिर विश्वस्त मंडळ बरखास्त केले आहे. या निर्णयाचे शनी शिंगणापूर ग्रामस्थ आणि विश्वस्त मंडळाच्या कारभाराविरुद्ध लढा देणाऱ्यांनी जाहीर स्वागत केले आहे. अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी २७ सप्टेंबरपासून शनी शिंगणापूरच्या शनी मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे प्रभारी अध्यक्षपद स्वीकारले आहे.

Comments
Add Comment