Friday, September 26, 2025

आनंदाचा ठेवा... भोंडला!

आनंदाचा ठेवा... भोंडला!

तेव्हा नवरात्र सुरू झाली की आम्हा मुलींना अगदी आनंदाचं भरतं यायचं. बहुतेक करून शाळेतच, वर्गातच खुसुखुसू करत, एकमेकींच्या कानात कुजबुजत भोंडल्याचा दिवस ठरवला जायचा. एकाच दिवशी २/ ३ हुन जास्त घरी नको, जवळ जवळ घरं असणाऱ्या मैत्रिणी एकाच दिवशी भोंडला ठरवीत असत म्हणजे पुन्हा पुन्हा फेरा नको मैत्रिणींना... अशी काळजीही घेतली जायची.

शाळा सुटली की धूम पळत घरी यायचं, पटकन खसाखसा हातपाय धुवायचे, युनिफॉर्म बदलून फ्रेश व्हायचं, कपडे बदलून ठेवणीतले कपडे घालायचे, (जे बहुदा दोन किंवा तीनच असत), लहान बहिणीला सोबत घ्यायचं (ते शेपूट बरोबर हवेंच असे) आणि लगबग करत मैत्रिणींची घरं गाठायची. किती आनंद, ओढ असे या सगळ्यात...

बहुतेक सगळ्यांचीच घरं लहान होती, २०/२५ मैत्रिणी जमत... पाटावर हत्तीचे चित्र काढून त्याला हळद कुंकू, फुलं वाहून त्याभोवती फेर धरून सगळ्याजणी उत्साहाने गाणी सुरू करत. पाटाखाली रांगोळीचे ठिपके काढीत, एकेक गाणं संपलं की एकेक ठिपका पुसायचा.

ऐलमा पैलमा’ने सुरुवात व्हायची... मग ‘एक लिंबू झेलू बाई’ ने दणक्यात आवाज वाढत जायचा. मग माहेरची स्तुती आणि सासरच्या तक्रारींची गाणी व्हायची. पूर्वीच्या काळी मुलींना मोकळेपणी बोलायची, आपली मतं मांडायची मुभा नव्हती. काहीही वाटलं तरी ते मनातच कोंडून ठेवावं लागे. उठसुठ माहेरी जायला मिळत नसे. हळदीकुंकू, ओटीभरण, भोंडला, लग्नकार्य याशिवाय करमणुकीचे प्रकार ही नव्हते. त्या सगळ्याचा रोष, कसर ही गाणी म्हणून भरून काढली जायची. बालवयातच लग्न झालेल्या सासुरवाशीणींचं मन जरा मोकळं व्हायचं.

माहेरी जायची वेळ आली की, ‘कारल्याचा वेल लाव ग सुने’ने सुरुवात होऊन ‘कारल्याची भाजी करून घाल ग सुने, आणि मगच जा माहेरी’अशी जरब असे. सून रूसून बसली की, ‘यादवराया राणी रुसून बसली कैसी’, म्हणत तिला आंजारून गोंजारून घरी परत आणण्याची चढाओढही लागायची. एरव्ही बहिणींसारख्या असणाऱ्या नणंद-भावजया ‘शिंक्यावरचं लोणी खाल्लं कोणी?’, म्हणत एकमेकींवर आळ घ्यायच्या. मग ‘असं सासर द्वाड बाई, कोंडून मारीतं’, म्हणत घोर तक्रार व्हायची. ‘हरीच्या नैवेद्याला केली, जिलबी बिघडली’, म्हणत त्यातून कोणतीही वस्तू वाया न घालवता ‘वेस्ट मधून बेस्ट’ कसं बनवायचं , याची शिकवण दिली जायची. ‘श्रीकांता, कमलाकांता’ म्हणत असं कसं ध्यान माझ्या वाट्याला आलं. ह्याची खंतही हळूच व्यक्त व्हायची. तर, कृष्ण घालितो लोळण म्हणताना आपल्या शोनुल्याचे कोणतेही हट्ट पुरवायला तयार असलेली आई, त्याला आकाशातल्या चंद्र चांदण्याही आणून द्यायला मागे पुढे पाहायची नाही. घरादाराभोवती फिरून झालं की मग सामाजिक भानातही स्त्री मागे राहायची नाही. ‘शिवाजी आमुचा राणा’ म्हणत ती मुलाबाळांच्या मनात शौर्य जागवायची.

अशी सगळी गाणी झाली की शेवटी ‘आड बाई आडोणी, आडात पडला शिंपला, म्हणत भोंडला संपायचा. सगळ्याजणी हसत खिदळत खिरापत ओळखायला तयार व्हायच्या. आपल्या घरची खिरापत कोणीही ओळखू नये, म्हणून आया आणि मुली जीवाचा आटापिटा करायच्या. नवनवीन शक्कला लढवून पदार्थ बनवायच्या. गोड की तिखट...? ओला की कोरडा...? गोल की चौकोनी...? रंग...? असे सगळे ऑप्शन्स विचारून खिरापत ओळखण्याची चढाओढ लागायची. शेवटी हार मानून यजमान मुलीलाच खिरापत सांगण्याची गळ घातली जायची. तेव्हा जग जिंकल्याचा आनंद व्हायचा.

आज हे सारं आपण विसरत चाललोय.....हळुहळू हरवतंय...याची खंत पोखरतेय.....!! - आरती कोचरेकर

Comments
Add Comment