प्रणित मोरे आणि बसीर-आमल यांच्यातील वादामुळे महाराष्ट्रातून 'कॉमेडियन'ला मोठा सपोर्ट
मुंबई: टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस १९' मध्ये सध्या मराठी स्पर्धक प्रणित मोरे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. प्रणित हा मूळचा मराठी स्टँड-अप कॉमेडियन असून, तो घरात एका नव्या वादात अडकल्यामुळे त्याचे चाहते आणि मराठी सिनेसृष्टीतील मंडळी त्याला मोठ्या प्रमाणावर समर्थन देत आहेत.
प्रणित मोरेचा बिग बॉसच्या घरात आमल मलिक आणि बसीर अली यांच्याशी जोरदार वाद झाला. या भांडणात बसीर अलीने विनाकारण हस्तक्षेप केला, ज्यामुळे प्रणितचा या दोघांनी मिळून प्रचंड अपमान केला. या घटनेनंतर सोशल मीडियावर प्रणितच्या समर्थनात मोठी लाट उसळली आहे. केवळ सामान्य चाहतेच नव्हे, तर अनेक मराठी कंटेन्ट क्रिएटर आणि सेलिब्रिटी देखील त्याला उघडपणे पाठिंबा देताना दिसत आहेत.
अभिनेता अभिजित केळकरचा सक्रिय पाठिंबा
मराठी अभिनेता अभिजित केळकर याने प्रणित मोरेला पूर्णपणे पाठिंबा दर्शवला आहे. प्रणित या आठवड्यात घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेला असल्यामुळे, त्याला वाचवण्यासाठी अभिजित केळकर सोशल मीडियावर जोरदार प्रचार करत आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये चाहत्यांना भावनिक आवाहन केले आहे.
अभिजित केळकरने पोस्टमध्ये लिहिले आहे, "आपला मराठी वाघ लढतोय, त्याला आपण सपोर्ट नाही करणार मग कोण करणार?" अभिजितने स्वतः प्रणितला मत (Vote) दिल्याचे सांगून, चाहत्यांनाही प्रणितला वोट करण्याचे आवाहन केले आहे.
'बिग बॉस'च्या घरात मराठी स्पर्धकाला अशा प्रकारे अपमानित करणे किंवा त्याला लक्ष्य करणे हे नवीन नाही. परंतु, प्रणितच्या बाबतीत चाहत्यांनी आणि कलाकारांनी दिलेला हा एकत्रित प्रतिसाद महत्त्वाचा ठरत आहे. या सपोर्टमुळे, घरात एकटा पडलेल्या आणि अन्याय झालेल्या मराठी कलाकाराच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र उभा असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. प्रणित मोरेला वाचवण्यासाठी आता महाराष्ट्राची व्होट पॉवर किती निर्णायक ठरते, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे