Friday, September 26, 2025

गोरेगावमध्ये होणार म्हाडाची ३८ मजली व्यावसायिक इमारत

गोरेगावमध्ये होणार म्हाडाची ३८ मजली व्यावसायिक इमारत

राज्य सरकारकडे संबंधित प्रस्ताव सादर

मुंबई : गोरेगाव (पश्चिम) येथील पत्राचाळ पुनर्विकासाअंतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाला विक्री घटकाअंतर्गत उपलब्ध झालेल्या आर-५ भूखंडावर मंडळाने उत्तुंग अशी व्यावसायिक इमारत उभारण्याचा निर्णय घेतला आहे. गोरेगावमध्ये सुमारे ७५० कोटी खर्च करून ३८ मजली व्यावसायिक इमारत उभारण्यात येणार असून मंडळाने यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला आहे. या व्यावसायिक इमारतीचे बांधकाम कन्स्ट्रक्शन अँड डेव्हल्पमेंट एजन्सी (सी अँड डी) प्रारुपानुसार अर्थात खासगी विकासकाची नियुक्ती करून केली जाणार आहे.

या प्रकल्पातून मुंबई मडंळाला अधिमूल्याच्या रूपात ३५० कोटी रुपये महसूल मिळणार आहे, तर किमान १० हजार ४०० चौरस मीटर क्षेत्रही उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारकडून या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेस सुरुवात करण्यात येणार आहे. मंडळाला या प्रस्तावाच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे.

पत्राचाळ पुनर्विकासातून उपलब्ध झालेल्या ९ हजार ९६८ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या आर-५ भूखंडावर व्यावसायिक इमारत उभारण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. मंडळाने सल्लागार कंपनीकडून या इमारतीचा सविस्तर आराखडा तयार करून घेतला आहे. आराखड्यानुसार या भूखंडावर ३८ मजली इमारत बांधण्यात येणार असून यात दोन विंग्ज असणार आहेत. तर या इमारतीची रचना आकर्षक असेल. खासगी कंपन्यांसह आंतरराष्ट्रीय कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी या इमारतीत अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत. त्याचवेळी चार रेस्टॉरन्ट, मंगल कार्यालय, १०० खोल्यांचे हॉटेल आदीही सुविधा यात असणार आहेत.

प्रस्ताव काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडे

या प्रकल्पाचा प्रस्ताव काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविल्याची माहिती म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या प्रस्तावानुसार निविदा प्रक्रियेत मंडळाला १० हजार ४०० चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळ देणाऱ्या विकासकाची नियुक्ती या कामासाठी केली जाणार आहे, तर विकासकाकडून अधिमूल्य आणि क्षेत्रफळही घेण्यात येणार आहे. मंडळाला अधिमूल्याच्या रूपात ३६० कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे, तर किमान १० हजार ४०० चौरस मीटर क्षेत्रही मिळणार आहे.

मंडळाकडून १४९ दुकानांचा ई लिलाव

मुंबई मंडळाला मिळणाऱ्या क्षेत्रातील ५० टक्के क्षेत्र वी वर्क संकल्पनेनुसार भाड्याने दिले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी ७५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. महत्त्वाचे म्हणजे मंडळाने तयार केलेल्या आराखड्याप्रमाणेच विकासकाला व्यावसायिक इमारत बांधावी लागणार आहे. त्यात त्याला केवळ तुरळक बदलच करता येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, मुंबई मंडळाकडून नुकताच १४९ दुकानांचा ई लिलाव करण्यात आला. या ई लिलावत केवळ ७० दुकानांचा ई लिलाव झाला असून ७९ दुकाने रिक्त राहिली आहेत. बिंबिसारनगर येथील व्यावसायिक इमारतीतील दुकानांचा यात समावेश आहे. म्हाडाच्या दुकानांना प्रतिसाद मिळत नसताना गोरेगावमध्ये उभ्या राहणाऱ्या उत्तुंग आणि पंचतारांकित व्यावसायिक इमारतीला प्रतिसाद मिळणार का हाच प्रश्न आहे.

Comments
Add Comment