Friday, September 26, 2025

दिवंगत राजेश पिंजानी यांचा अखेरचा चित्रपट ‘गोट्या गँगस्टर’

दिवंगत राजेश पिंजानी यांचा अखेरचा चित्रपट ‘गोट्या गँगस्टर’

‘बाबू बँड बाजा’ या चित्रपटासाठी दिग्दर्शक राजेश पिंजानी यांनी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. मात्र त्यांचे अलीकडेच अकाली निधन झाले. त्यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट 'गोट्या गँगस्टर' आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचा अॅनिमेटेड टीजर लाँच करण्यात आला असून, लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

अन्नपूर्णा प्रॉडक्शन्स निर्मित गोट्या गँगस्टर या चित्रपटाची निर्मिती अन्नपूर्णा बिरादार, राजेश्री बिरादार, संदीप बिरादार यांची असून चित्रपटाची प्रस्तुती व सह निर्माते ऋतुजा पाटील, शिव लोखंडे यांनी केली आहे. राजेश पिंजानी यांनी लेखन दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात उत्तम स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. प्रवीण तरडे, प्रथमेश परब, डॉ. मोहन आगाशे, श्रीकांत यादव, अश्विनी गिरी, भूषण मंजुळे, विनोद वणवे, ऐश्वर्या शिंदे यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. मायानगरी मुंबईतील एका चाळीत राहणाऱ्या तीन मित्रांची गोष्ट गोट्या गँगस्टर या चित्रपटांतून उलगडणार आहे. आयुष्यात घडणाऱ्या काही घटनांमुळे त्या तिघांवर किडनॅपिंग करण्याची वेळ येते. त्या दरम्यान, काही वर्षांपूर्वी मुंबई सोडून थेट दुबईला पळून गेलेला डॉन चिमण भाई अचानक मुंबईत परततो. आणि त्या नंतर सुरू होतात विनोदी प्रसंग, भन्नाट संवाद आणि न संपणारी धमाल... त्यामुळे मनोरंजक कथानक, खुसखुशीत संवाद, दमदार दिग्दर्शन, उत्तम अभिनयाची मेजवानी या चित्रपटातून मिळणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, बाबू बँड बाजासारखा कसदार चित्रपट केलेल्या राजेश पिंजानी यांच्या सहृदय दिग्दर्शक कलावंताची कलाकृती पडद्यावर येणार आहे.

Comments
Add Comment