Friday, September 26, 2025

गुंतवणूकदारांनी राज्यातील जहाज बांधणी उद्योगात योगदान द्यावे

गुंतवणूकदारांनी राज्यातील जहाज बांधणी उद्योगात योगदान द्यावे

मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्रात जहाज बांधणी आणि बंदरे क्षेत्रात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध असून या क्षेत्रातील गुंतवणूक प्रोत्साहनासाठी राज्याने स्वतःचे जहाज बांधणी धोरण तयार केले आहे. गुंतवणूकदारांनी या धोरणाचा लाभ घ्यावा आणि राज्याच्या जहाज बांधणी उद्योगाच्या विकासात योगदान द्यावे, असे प्रतिपादन मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले.

ताज सांताक्रूझ येथे आयोजित तिसऱ्या जागतिक बंदरे व जहाज परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री राणे बोलत होते. यावेळी परिवहन व बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, बेल्जियमचे वाणिज्य दूत फ्रँक गिरकेन्स, नॉर्वेचे वाणिज्य दूत मोनिका नागेलागार्ड उपस्थित होते.

केंद्र सरकारने सागरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीची घोषणा केली असल्याचे सांगून मंत्री राणे म्हणाले की, महाराष्ट्राने देशातील पहिले जहाज बांधणी धोरण तयार केले आहे. या धोरणामुळे राज्य जहाज बांधणी व बंदर विकास क्षेत्रात देशाचे नेतृत्व करेल. जहाज बांधणी आणि सागरी क्षेत्रातील गुंतवणूकदारांना शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल. पर्यावरणीय परवानग्या मिळवण्यासाठी राज्याची स्वतःची एमसीझेडई कमिटी आहे; तिच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना सुलभतेने परवानग्या मिळतील. उद्योगस्नेही धोरणामुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात चांगल्या सुविधा मिळतील. वेळेत प्रकल्प कार्यान्वित व्हावेत यासाठीही शासन आवश्यक पावले उचलणार असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले.

देशाचे नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता

मंत्री राणे म्हणाले की, महाराष्ट्रात जागतिक स्तरावरील जलमार्ग विकसित केले जातील व जलवाहतुकीला प्राधान्य देण्यात येणार आहे. यामुळे वेळ व इंधनाची बचत होऊन अर्थव्यवस्था सक्षम होईल. मुंबईमध्ये लवकरच सुरू होणाऱ्या वॉटर मेट्रोमुळे वाहतुकीवरील ताण कमी होईल. मुंबई व कोकण भाग जलवाहतुकीने जोडला जाणार असून रो-रो सेवा सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे. जहाज बांधणी उद्योगात देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता महाराष्ट्रात असून शासन गुंतवणूक व दररचनेच्या बाबतीत सहकार्य करेल, असेही राणे यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment