Monday, January 12, 2026

टपाली मतानंतरच ईव्हीएम मतांची मोजणी

टपाली मतानंतरच ईव्हीएम मतांची मोजणी

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून मतचोरीच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे निवडणूक आयोगाला सातत्याने लक्ष्य करत आहेत. यादरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाने पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीबाबतच्या नियमामध्ये बदल केला आहे. आता ईव्हीएम आणि व्हीहीपॅटमधील मतांच्या मोजणीचा दुसरा आणि अंतिम टप्पा हा पोस्टल बॅलेटची मोजणी पूर्ण झाल्यानंतरच सुरू होईल. याआधी ईव्हीएममधील मतांची मोजणी ही पोस्टल बॅलेटची मोजणी पूर्ण होण्यापूर्वीही पूर्ण होऊ शकत असेल. हा बदल पारदर्शकता आणि स्पष्टता सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आला आहे.

मतदानादिवशी पोस्टल बॅलेटची मतमोजणी ही सकाळी ८ वाजता सुरू होते, तर ईव्हीएमची मोजणी ही ८.३० वाजता सुरू होते. आधी ईव्हीएमची मोजणी ही पोस्टल बॅलेटच्या मोजणीच्या कुठल्याही टप्प्यात सुरू राहत असे. तसेच ती आधी पूर्ण होण्याची शक्यताही नाकारली जाऊ शकत नव्हती. दरम्यान, आता ईव्हीएम/व्हीहीपॅटच्या मोजणीचा दुसरा टप्पा हा पोस्टल बॅलेटमधील मतपत्रिकांची मोजणी पूर्ण झाल्यानंतरच सुरू होईल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

मतमोजणी प्रक्रियेमध्ये एकरूपता आणि अधिकाधिक स्पष्टता आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे, असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. जिथे पोस्टल बॅलेटची मतमोजणी केली जाते विशेष करून तिथे हा बदल लागू केला जाणार आहे.

Comments
Add Comment