Thursday, September 25, 2025

राज्य सरकारचा पूरग्रस्तांना मोठा दिलासा: मृतांच्या कुटुंबियांना ४ लाख, गुरांसाठीही मदत

राज्य सरकारचा पूरग्रस्तांना मोठा दिलासा: मृतांच्या कुटुंबियांना ४ लाख, गुरांसाठीही मदत

मुंबई: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना तातडीने मदत पोहोचवली जात आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारने सर्वकष उपाययोजना हाती घेतल्या आहे. पावसाशी संबंधिक विविध दुर्घटनांमध्ये राज्यात आतापर्यंत ८४ जणांचा बळी गेला आहे. सरकारकडून पंचनामे तसेच पाहणी दौरे युद्धपातळीवर केले जात आहे. तसेच आठ दिवसांच्या आत पूरग्रस्तांना सरकारकडून मदत दिली जात आहे. पूरग्रस्त नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी सरकारने सर्व यंत्रणा कामाला लावल्या आहेत. त्यांना तातडीने आर्थिक मदत केली जावी अशा प्रकारचे थेट आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या मदतीमध्ये जीवितहानी आणि मालमत्तेच्या नुकसानीसाठी भरपाईचा समावेश आहे.

सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार, पूर आणि अतिवृष्टीमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना ४ लाख रुपयांची मदत दिली जाईल. तसेच, या नैसर्गिक आपत्तीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांच्यासाठीही भरीव मदत पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यानुसार, कोरडवाहू पिकांसाठी प्रति हेक्टरी ८,५०० रुपये तर बागायती पिकांसाठी १७,५०० रुपये मदत दिली जाणार आहे.

याशिवाय, पूर आणि पावसामुळे ज्यांची जनावरे दगावली आहेत, त्यांच्यासाठीही नुकसान भरपाईची तरतूद करण्यात आली आहे. यानुसार, दुभत्या आणि मोठ्या जनावरांच्या मृत्यूप्रकरणी ३७,५०० रुपये तर शेळ्या आणि मेंढ्यांसाठी ४,००० रुपये मदत दिली जाईल.

या मदतीमुळे पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारने नुकसानीचे निकष शिथिल करून मदत नागरिकांपर्यंत लवकर पोहोचवण्याचे आश्वासन दिले आहे. यासोबतच, अनेक सामाजिक संस्था आणि मंडळांनीही पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. मुंबईतील प्रसिद्ध 'लालबागचा राजा' मंडळाने पूरग्रस्तांसाठी ५० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

हे मदत पॅकेज जाहीर करून सरकारने पूरग्रस्तांना पाठिंबा दिला आहे, ज्यामुळे संकटाच्या या काळात त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल.

Comments
Add Comment