
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात लवकरच ९७ अत्याधुनिक ‘तेजस मार्क-1ए’ लढाऊ विमाने दाखल होणार आहेत. केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) सोबत ६२,३७० कोटी रुपयांचा एक मोठा करार केला आहे, ज्यामुळे देशाच्या संरक्षण क्षेत्राला मोठा बूस्ट मिळेल. हा करार 'आत्मनिर्भर भारत' अभियानांतर्गत देशातील सर्वात मोठ्या स्वदेशी लष्करी खरेदीपैकी एक आहे.
स्वदेशी संरक्षणासाठी ऐतिहासिक पाऊल
या महत्त्वाकांक्षी करारानुसार, एचएएल भारतीय हवाई दलासाठी ६८ लढाऊ विमाने आणि २९ दोन-सीटर विमानांची निर्मिती करणार आहे. ही विमाने सध्याच्या मिग-२१ विमानांची जागा घेणार आहेत. यापूर्वी ८३ तेजस विमानांसाठी ४८,००० कोटींचा करार झाला होता, त्यामुळे हा नवीन करार आतापर्यंतचा सर्वात मोठा मानला जात आहे.
'तेजस मार्क-1ए' हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आहे. यात प्रगत एईएसए (Active Electronically Scanned Array) रडार, स्व-संरक्षण यंत्रणा आणि ६४% पेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीचा वापर केला जाणार आहे. एकूण ६७ नवीन स्वदेशी उपकरणांचा समावेश यामुळे 'तेजस' अधिक शक्तिशाली बनेल. या प्रकल्पाच्या माध्यमातून आगामी सहा वर्षांत दरवर्षी सुमारे ११,७५० नवीन रोजगार निर्माण होणार आहेत. विमानांची डिलिव्हरी २०२७-२८ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे हवाई दलाची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
हा करार अशा वेळी करण्यात आला आहे, जेव्हा भारतीय हवाई दलातून ६२ वर्षे जुन्या आणि विश्वासार्ह मिग-२१ विमानांना निवृत्त केले जात आहे. मिग-२१ च्या निवृत्तीमुळे हवाई दलाची स्क्वॉड्रन संख्या ४२ वरून २९ वर आली आहे, परंतु तेजस मार्क-१ आणि मार्क-२ विमानांच्या समावेशामुळे ही कमतरता भरून निघेल. मिग-२१ ने भारताच्या हवाई ताफ्यात एक युग निर्माण केले होते, आता तेजस हे नवीन युग सुरू करणार आहे.
एचएएलने सुरुवातीला दरवर्षी १६ विमाने बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, परंतु आता ९७ विमानांची अतिरिक्त ऑर्डर मिळाल्याने त्यांनी प्रतिवर्षी ३२ विमाने तयार करण्याची तयारी केली आहे. यामुळे देशाची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्ये
नवीन तेजस मार्क-1ए मध्ये ४३ तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या आहेत, ज्यात शस्त्रे आणि देखभालीची प्रणाली अधिक प्रगत झाली आहे. यात इस्रायली ईएल/एम-२०५२ रडारचा वापर केला जाणार आहे, जे जुन्या रडारपेक्षा अधिक प्रभावी आहे. तसेच, इस्रायली ईएल/एम-८२२२ जॅमर पॉडमुळे ते शत्रूंच्या रडार सिग्नलमध्ये व्यत्यय आणू शकेल, जे आधुनिक हवाई युद्धासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
या विमानांमध्ये प्रगत क्लोज-रेंज, बीव्हीआर आणि लांब पल्ल्याची बीव्हीआर क्षेपणास्त्रे बसवली जातील. याशिवाय, ते ५०० किलो वजनाचे बॉम्ब आणि इतर शस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असेल. एकूणच, हा करार केवळ हवाई दलाची ताकद वाढवणार नाही, तर भारताला संरक्षण उत्पादन क्षेत्रात एक मजबूत जागतिक खेळाडू म्हणून उभे करण्यासही मदत करेल.