
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील कमलापूर वनपरिक्षेत्रातील चिरेपल्ली बीट परिसरात ७६ वर्षांच्या गुराख्याने वाघाच्या हल्ल्याला तोंड देत स्वतःचा जीव वाचवला. ही घटना २४ सप्टेंबर रोजी सकाळी ९:३० वाजता घडली. या थरारक झुंजीत गुराखी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सकाळी नेहमीप्रमाणे खांदला गावातील गुरे चराईसाठी जंगलात घेऊन गेलेले शिवराम गोसाई बामनकर (वय ७६) यांच्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. परंतु, शिवराम यांनी घाबरून न जाता, मोठ्या हिंमतीने या हल्ल्याचा सामना केला. या दोघांमध्ये काही काळ झुंज सुरू होती. अखेरीस, शिवराम यांचा प्रतिकार जोरदार असल्याने वाघाला माघार घ्यावी लागली आणि तो जंगलात पळून गेला.
या हल्ल्यात शिवराम बामनकर गंभीर जखमी झाले. त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी खोलवर जखमा झाल्या आहेत. रक्ताच्या थारोळ्यात ते कसेबसे गावात पोहोचले आणि त्यांनी ही थरारक घटना कुटुंबीयांना व गावकर्यांना सांगितली. त्यानंतर, त्यांना तात्काळ राजाराम येथील आरोग्य पथकात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना अधिक उपचारासाठी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
दरम्यान, ७६ वर्षांच्या या गुराख्याच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिवराम यांच्या मुलीने, वनिता गजानन बामनकर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी, कमलापूर यांना निवेदन देत तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.