
पुणे : राज्यातील काही भागात पावसानं थैमान घातलंय. दुष्काळी गावांना अतिवृष्टीने झोडपल्यानं गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. नद्यांच्या पाणी पातळीत अभूतपूर्व अशी वाढ झाल्यानं अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. सीना नदीला इतिहासात पहिल्यांदाच पूर आलाय. नदीचं पाणी लांबोटी इथं सोलापूर-पुणे महामार्गावर आलं आहे. यामुळे सोलापूर पुणे महामार्ग रात्री ११ वाजल्यापासून बंद करण्यात आलाय. परिणामी महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. उत्तर सोलापुरातील तिऱ्हे गावाजवळ सीना नदीच्या पुलावरून वाहतूक बंद केली आहे. सोलापूर-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकसुद्धा बंद केल्याची माहिती समोर येत आहे. सीना नदीचं पाणी ओसरेपर्यंत ही वाहतूक बंद राहण्याची शक्यता आहे. वाहतूक बंद असल्यानं दैनंदिन जनजीवन विस्कळीत झालंय. सीना नदीच्या पुरामुळे रेल्वे वाहतुकीलासुद्धा फटका बसला आहे. सोलापूर विभागातील रेल्वे गाड्यांचा वेग सीना नदीवरील पुलावर ३० किमी प्रतितास इतका कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर करमाळा तालुक्यात मुंडेवाडी इथं पाणी रेल्वे पुलाजवळ पोहोचलंय.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अतिवृष्टीचा फटका बसलेल्या जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. सकाळी ते मुंबईतून सोलापूरला जाणार आहेत. माढा तालुक्यातील निमगाव, दारफळ या गावांसह भागातील पूरस्थितीची पाहणी करणार आहेत. यानंतर लातूरला उजनी, औसा, नणंद, औराद शहाजनी या भागात दौरा करणार आहे