Wednesday, September 24, 2025

राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत!

राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत!

धनंजय मुंडे, तानाजी सावंत इन, नरहरी झिरवळ, भरत गोगावले आऊट?

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडणार आहे. राज्य मंत्रिमंडळात आठवडाभरात फेरबदल होणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सहा महिन्यांपूर्वी राजीनामा द्यावा लागलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात परतणार, तर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांना पायउतार व्हावे लागेल, अशी सूत्रांची माहिती आहे.

हा बदल फक्त मंत्री बदल नाही, तर आगामी निवडणुकांच्या तयारीचा भाग आहे. गेली तीन वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होतेय. कोणाचं मंत्रिपद जाईल आणि कुणाच्या गळ्यात मंत्रि‍पदाची माळ पडेल, याची शाश्वती नाहीत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, 'उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्येष्ठ नेत्यांचा आग्रह आहे की धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद द्यावं. कारण मुंडे यांचं पुनरागमन अन्न व नागरी पुरवठा खात्यातील धोरणांना नवं वळण देऊ शकतात. तर दुसरीकडे नरहरी झिरवळ यांचा राजीनामा घेतला जाईल आणि त्यांना पक्षाचं मोठं पद दिलं जाऊ शकतं.'

या फेरबदलाला विवादाची किनार आहे. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड तुरुंगात आहे. कराडला मकोका लावलाय. याच प्रकरणात धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. याची शिफारस खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. ४ मार्च २०२५ रोजी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुंडेंचा राजीनामा स्वीकारला. आता, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी २०२६ पर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ फेरबदल हा निवडणुकीच्या तयारीचा भाग असल्याची सूत्रांची माहिती आहे.

धनंजय मुंडेंसारखा चेहरा आणि नेता मंत्रिमंडळातून बाहेर ठेवणं हे राष्ट्रवादी काँग्रेसला परवडणारं नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याची पुरती जाणीव आहे. तर शिवसेना आणि भाजपाही बदल करण्याच्या तयारीत आहेत.

शिवसेनेच्या तानाजी सावंत यांची मंत्रि‍पदी वर्णी लागू शकते, मात्र त्यासाठी भरत गोगावले यांचं मंत्रिपद सोडावं लागेल, अशीही सूत्रांची माहिती आहे. मागच्या सरकारमध्ये तानाजी सावंत हे वादग्रस्त ठरले होते. शिंदे सरकारमध्ये त्यांच्यावर सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीत ते भूम-परांडा मतदारसंघातून निवडून आले होते, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सावंतांचं मंत्रिपद हुकलं होतं. कदाचित त्यांनी नाराजी दूर करण्यासाठीही त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो, असंही सूत्रांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे भाजपाही किमान दोन मंत्री बदलण्याची शक्यता आहे.

धनंजय मुंडे बीड जिल्ह्यातील प्रभावी नेते आहेत. बीडमध्ये त्यांना जनाधारही आहे. त्यामुळे स्थानिक निवडणुकीपूर्वी त्यांचे पुनरागमन राष्ट्रवादीसाठी फायद्याचे ठरू शकते. मात्र नरहरी झिरवळ यांचा राजीनामा राष्ट्रवादीसाठी डोकेदुखीही ठरू शकते. कारण राष्ट्रवादीमधला हा फेरबदल राजकीय, मराठा आणि इतर समाजाच्या आरक्षण वादात तापदायक ठरू शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा विचार करून मंत्रिमंडळात फेरबदल होण्याचे संकेत आहेत, मात्र हे बदल एकाला न्याय आणि दुसऱ्यावर अन्याय करणारे आहेत, अशी चर्चा आता सुरू झालीय. महाराष्ट्रात गेल्या ५ वर्षात जवळपास २० पेक्षा अधिक मंत्री बदलले गेले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांचं पुनरागमन आणि तानाजी सावंत यांचा होणारा समावेश हा एक राजकीय डावपेच ठरू शकतो. मंत्रिमंडळातील फेरबदल हे त्या त्या पक्षांसाठी महत्त्वाचे असले तरी अस्थिरताही अधोरेखित करणारे आहेत.

आता धनंजय मुंडेंचं मंत्रिमंडळात पुनरागमन कधी होणार? तानाजी सावंत यांची नाराजी दूर होणार ? भाजपा कुणाला संधी देणार? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा