Tuesday, September 23, 2025

सावली उन्हामध्ये, तसा तू माझ्या मनी...

सावली उन्हामध्ये, तसा तू माझ्या मनी...

माेरपीस : पूजा काळे 

बहुतांशी मोठ्या मनाची माणसं अव्यक्त असतात. शक्यतो सिद्धी प्रसिद्धीच्या प्रवाहापासून लांब राहणं पसंत करतात. मूलत: त्यांच्या स्वभावात इतरांपेक्षा आश्चर्यकारक वेगळेपण असतं. प्रथम दर्शनी त्याचा बोध होत नाही पण जसजसं सान्निध्य वाढतं तसं त्यांच्या प्रकाशझोतात आपण दीप्त होतो. प्रवाहासोबत वाहणाऱ्यांना प्रवाहाविरुद्ध वागणं जमत नाही. आपली हुशारी, ज्ञान, मैत्री आणि आनंद इतरांना वाटण्यात हाताच्या बोटाएवढी असलेली माणसं, त्यांचं सालस व्यक्तिमत्त्व जीवनात आल्याने आयुष्याला वळण लागतं. यासाठी फार लांब जायची गरज नसते. आपल्या आसपास असलेली जवळची माणसं यामध्ये येतात. जवळच्या माणसांविषयी आपण फारसं बोलत नाही. त्यांच्याही काही अपेक्षा नसतात आपल्याकडून. भरभरून देणारी माणसं भरभरून बोलतील का? याचं उत्तर नाही असं देता येईल. कर्तव्याला श्रेष्ठतम मानणाऱ्या काही कंठश्च व्यक्तींपैकी ते एक उमदं व्यक्तिमत्त्व. आज त्याचा दिवस. लोकांनी जे करू नये असं आपणास वाटतं ते आपणही करू नये अशा आग्रही मताचा. स्त्रियांनी पुढे येऊन प्रेरणा घ्यावी, स्वत:ची प्रगती साधावी अशी विचारसरणी घेऊन वावरणारा असामी. दाम्पत्य जीवनाच्या सुरुवातीच्या काळात समजून घेण्यासाठीचा वेळ, काळ खूप आश्वस्थ असतो. आवडी-निवडी उमजताना नाळ जुळली जाते. जाणीवपूर्वक हक्काला बाजूला सारत जीवन कर्तव्याला बांधलेला त्याच्यासारखा तोच. त्याच्या केवळ असण्यानेच मनाची अस्थिरता नाहिशी व्हावी. मित्र-मैत्रिणींपेक्षा विश्वासाने काहीतरी सांगण्यासारखं एक माणूस जवळ असतं. ज्याच्या सोबतीनं ऊपरण्याला गाठ बांधली जाते. लाडे लाडे भांडायला विषय पुरेनासे होतात. संसार पटलावर तरलता येऊ लागते. रेशमी धाग्यात गुंफलेले घरदार, आई-बाबा, मूलबाळ, नातेवाईक यांची सय त्याला सुटत नाही. तुझं माझं असं काहीही उरत नाही. आपलं नाव ज्याच्या बरोबर जोडलं जातं तो आपला प्रिय सखा म्हणा, वा नवरा जो आपल्याकडून सूचना, संकेत घेत प्रगती साधतो. मी त्याचच अनुकरण करत प्रगती साधण्याचा प्रयत्न करते. त्याच्यामुळे कार्यत्परत होत महान ठरते. माझ्यावर कुटुंबावर प्रेम करणारा, आनंद लुटणारा तो स्वतः आतल्या आत महान असतो. त्याच्यातली सुप्त शक्ती मला बळ देते. माझं असणं त्याच्यासाठी जगणं असतं. तर त्याच असणं माझ्यासाठी लाखमोलाचा आधार ठरतो. जगाच्या शेवटापर्यंत हे सत्य बदलणार नाही की, माझ्या यशात त्याचं भरीव योगदान आहे. त्या आधारामुळेचं तर कार्यालयासारख्या ठिकाणी, घरात आणि सामाजिक जीवनात छाप पाडू शकलेय. कधी बोलून, व्यक्त करता आल्या नाहीत अशा भावनांसाठी कवयित्री संगीता मानेंच्या रचनेतील काही ओळी तुझ्या खास दिवसासाठी पेरताना आनंद होतोय.

चोर पावलांनी आला, गंध प्रीतीचा अंतरी... नेत्र कटाक्ष पहिला, आरपार गेला उरी... गंधप्रीतीचा जसा, फाया अत्तराचा बाई... फुल प्रेमाचे नाजूक, फुललेली गंध जाई... खरंच या सुंदर जीवनी जाईजुई करून गेलास मला आणि मजसाठी कृष्णसखा झालास हा असा.

‘हे कृष्णा, मी पाहिलयं तुला अवनीवर अवतीर्ण होताना, दु:खीकष्टी चेहऱ्यावर हसू पेरत फिरताना... हे कृष्णा, मी पाहिलयं तुला अंतरंगी वेदनेसह होरपळताना, अन् अथांग यमुनेच्या शांत डोहात, अश्रू आतल्या आत लपवताना...

हे कृष्णा, मी पाहिलयं तुला, स्वप्न सत्यात उतरवताना, अन् क्षणोक्षणी माझ्यासह माझ्यासाठीचं जगताना... हे कृष्णा, आता मीही तुझ्यासारखं कृष्ण होऊन जगावं म्हणतेय, थोडं हसावं म्हणतेय..अन् उरलसुरलं बळ अंगी आणून, हसरा चाफा फुलवावा म्हणतेय, बळ अंगी आणून, हसरा चाफा फुलवावा म्हणतेय.’

‘सावली उन्हामध्ये तसा माझ्यामध्ये तू आहेस.’ तुझं कौतुक करावया मजकडे शब्द नाहीत. संघर्ष करून यश मिळवताना, तुझ्या पाठबळाने अधिक शक्तिशाली बनलेय मी. मला पाठिंबा देताना आधारस्तंभ बनून मार्ग दाखवलास. स्वयंभू बन म्हणत डोक्यावर हात ठेवलास, विश्वासाने शाबासकी दिलीस. वर्चस्वापेक्षा मित्र होऊन जगलास. विसरला नाहीस स्वत:ची कर्तव्यं. आई, माई, ताईच्या भूमिकेतली स्त्री जशी सर्वसमावेशक सामावून घेते इतरांना तसाच तू ही उत्तम भूमिका निभावत राहिलास. तू सर्वज्ञ आहेस याचा मला अभिमान आहे. पुढे हो, आपलं स्थान बनव, छंद जोपास, हक्कासाठी लढ, शौर्याची कास धर, कणखर बन, स्वत:चा आधार हो, तुझ्या प्रगल्भ विचार बळावर पोसले गेलेय मी. बाहेरच्या जगतातून घरी आल्यावर नवरोबा तुमच्या ओंजळीत सुगंधी मोगरा ठेवत, प्रसन्न चेहऱ्यानं तुमचं स्वागत करतो; त्याक्षणी तुमच्या प्रवासाचा शीण सरतो. सुख म्हणजे आणखी काय असतं हो? तुझ्या विषयीच्या भावना शब्दात मांडणं सोपं नाही. लाख प्रयत्नातला हा एक प्रयत्न बघ कसा वाटतोय ते...!

मी काही वेगळी नाही तुझ्यापासून, तुझा हात धरून येताना, तुझी सगळी शक्ती झाले तरी तुझ्या प्राणातला अंश न् अंश, तुझं बळ ओढून घेतलं मी...तुला राखलं कर्तव्यापुरता, नावापुरता.. यास्तव सगळे अलंकार, आभूषण मिरवीत आले मी.. निमित्त केवळ महिला दिनाच्या सोहळ्याचं. मात्र माझे सारे सोहळे तुझ्यातच सामावलेत. तुझं असं खंबीर असणं चेतना देतं मला. आनंदी ठेवत कुटुंबाला, विश्वास देतं नात्याला. तू नसतास तर सगळ्याला पारखी झाले असते मी. तुझ्यावर रागवताना, हट्ट धरताना, नेहमीच असतो माझा स्पेशल दिवस. तुझ्या ऋणातून मुक्तता व्हायची नाही, एवढं देऊन रिता होतोस. कौतुक करावं ते तुझं, तुझ्या भूमिकेचं... तुझ्या समर्पणाचं...बाप नावाच्या रत्नाचं...नवऱ्याच्या साधेपणाचं...तू नसताना जीव होई बावरा... सांग कसे जगू मी तुझ्याविना.. तुझ्याविना...!

Comments
Add Comment