
मुंबई : नवरात्रोत्सव म्हटलं की रास-गरबा, दांडिया, पारंपरिक गोंधळ, महिलांचे हळदीकुंकू, सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाजोपयोगी उपक्रम यांची रेलचेल. मुंबईच्या उपनगरातील अशोकवन कॉम्प्लेक्समध्येही यंदा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक थाटामाटात साजरा होणार आहे.
अशोकवन सोशल अॅण्ड कल्चरल असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवाचं यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे सांस्कृतिक परंपरेच्या ३५ वर्षांचा टप्पा ते पार करताय. १२०० हून अधिक सदनिका आणि ६५ रो हाऊसेस असलेली ही संपूर्ण कॉलनी १००% हिंदू कुटुंबियांनी वसलेली असून, एकात्मता आणि सांस्कृतिक समृद्धीचं प्रतीक ठरत आली आहे.
या नवरात्रोत्सवात नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये, मुलांसाठी मोफत पुस्तक वितरण, महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आणि पैठणी स्पर्धा,पारंपरिक गोंधळ यांचा समावेश आहे.
यावर्षी उत्सवात रंगत वाढवण्यासाठी मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कलाकार कुशल बद्रिके आणि तेजस्विनी लोणारी यांची खास उपस्थिती राहणार आहे. कलाकार आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत सामाजिक जाणीव असलेले उपक्रमही राबवण्यात येणार आहेत.
या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी दिलीप सावंत, कल्पेश लोके, मनीष प्रभू, प्रद्युम्न सावंत यांच्यासह संपूर्ण आयोजक मंडळ मेहनत घेत आहे. जास्तीत जास्त नागरिक या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आयोजकांतर्फे प्रयत्न केले जात आहे.