Thursday, October 23, 2025
Happy Diwali

कृष्णरंग

कृष्णरंग

मायभाषा : डॉ. वीणा सानेकर

साहित्य, समाज आणि संस्कृतीचे धागे लोकमानसात गुंतलेले असतात. काळाच्या पटलावरून त्यांची स्मृती पुसली जात नाही कारण त्या आठवणी लोकमानसाचा भाग होतो. संगीत, साहित्य आणि विविध कलांमधून या आठवणींची शिल्पे साकार झाली आहेत. मात्र एका धाग्यात गुंफून त्या आठवणी समाजासमोर रंगमंचीय साकारण्यातला आनंद मोठा आहे. हा आनंद घेण्यातला आणि देण्यातला रस अनुभवायला शिकवले ते आमच्या जयवंत सरांनी.

एक संकल्पना निवडून त्या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम सादर करण्याची सवय आम्हाला सरांनी लावली. त्यासाठी मग विविध संदर्भ शोधणे, ‘गाणी ऐकणे, जुने लेख चाळणे’ असा आमचा प्रवास सुरू झाला.

अभिवाचन, नाट्यवाचन, लेखन, निवेदन, संगीत अशा सर्व अंगांनी संकल्पना साकार करण्याचे धडे आम्ही सहज गिरवू लागलो. त्याकरिता कोणताही प्रमाणपत्र अभासक्रम आम्हाला करावा लागला नाही. खेरीज रंगमंचावर होती तशी पडद्यामागेही मुले वावरत होती. त्यामुळे अलीकडच्या मुलांसारखे इव्हेंट मॅनेजमेंटचे प्रशिक्षण न घेताच कार्यक्रमाच्या आयोजनात मुले तरबेज झाली.

मराठी साहित्य, संगीत, कला या विविध अंगांनी विद्यार्थी अभ्यास करू लागले. आपसुकच ते या सर्वाशी जोडले गेले. नमन नटवरा हा नाट्य संगीताचा प्रवास रेखाटणारा कार्यक्रम, गीत गदिमा हा ग. दि. माडगूळकर यांच्या गीतांचा कार्यक्रम, भावधारा हा मराठी भावसंगीताचा आढावा घेणारा कार्यक्रम, स्वरवंदना हा संगीतकार केशव भोळे यांच्या गीतांचा कार्यक्रम असे विविध कलाविष्कार आम्ही सरांच्या मार्गदर्शना खाली साकारले.

या सर्व आठवणी जाग्या होण्याचे कारण म्हणजे जयवंत सरांच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सजवलेला कार्यक्रम - ‘कृष्णरंग.’ सोमैया विद्याविहार विद्यापीठाच्या ‘भाषा आणि साहित्य’ विद्याशाखेतर्फे येत्या शनिवारी हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता सोमैया विद्याविहार संकुलात साकार केला जाणार आहे. कृष्णाचा साहित्य आणि संगीतमय विश्वातील निवडक रूपांचा हा शोध आहे.

जयवंत सरांचे अस्मिता पांडे, माणिक सहस्त्रबुद्धे, सुलेखा दोशी, उत्तरा मोने, गौरी संसारे, शैला आचरेकर हे विद्यार्थी हा कार्यक्रम सादर करीत आहेत आणि मीही या कार्यक्रमाचा भाग होऊ शकते कारण मीही जयवंत सरांची भाग्यवंत विद्यार्थिनी आहे.

कृष्णरंगची तयारी करत असताना दुर्गा भागवत, अरुणा ढेरे, शांता शेळके, पु. शि. रेगे, सुरेश भट गुजरातीतील दिनकर जोशी, सुरदास, मीराबाई, अशा सर्वांचे संदर्भ शोधताना आपल्या भाषेसोबत विविध भाषांचा भावगंध अनुभवणे हे विलक्षण आनंददायी आहे.

Comments
Add Comment