दुबई: अभिषेक शर्माची स्फोटक फलंदाजी आणि कुलदीप यादवच्या प्रभावी फिरकी माऱ्यामुळे भारताने आशिया कप २०२५ च्या सुपर फोर सामन्यात बांगलादेशचा ४१ धावांनी पराभव केला. अंतिम फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. भारताच्या विजयामुळे श्रीलंकेचा संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आता बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील विजेता संघ अंतिम सामना २८ सप्टेंबरला होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताचा मुकाबला करणार आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने १६८ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ १२७ धावांवर ऑलआउट झाला. भारताच्या विजयानंतर, भारताचे दोन सामन्यांत दोन विजयांसह ४ गुण आहेत. भारताचा नेट रन रेट +१.३५७ आहे. भारताला आता २६ सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध शेवटचा सुपर फोर सामना खेळायचा आहे. जरी श्रीलंकेने आपला शेवटचा सामना जिंकला तरी त्याचे २ गुण असतील. तर पाकिस्तान किंवा बांगलादेश यापैकी कोणीही जास्तीत जास्त ४ गुणांपर्यंत पोहोचू शकणार आहे. परिणामी श्रीलंका आशिया कपमधून बाहेर पडला आहे. भारताने आधीच अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या पाकिस्तानचे दोन सामन्यांतून एक विजय आणि एक पराभव असे दोन गुण आहेत आणि बांगलादेशचेही २ गुण आहेत. पण बांगलादेशचा नेट रन रेट पाकिस्तानपेक्षा खूपच कमी आहे. आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचणारा दुसरा संघ बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावरून निश्चित होईल. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत स्थान निश्चित करेल. बांगलादेशने भारताविरुद्ध शानदार कामगिरी केली. एका वेळी असे वाटले की, ते लक्ष्याचा पाठलाग करू शकतील. आता पाकिस्तानला पराभूत करत अंतिम फेरीत स्थान निश्चित करण्याचे लक्ष्य त्यांच्यासमोर असणार आहे. भारतीय संघाने आशिया कप २०२५ च्या त्यांच्या दुसऱ्या सुपर फोर सामन्यात बांगलादेशचा ४१ धावांनी पराभव केला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने विजयासाठी १६९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. बांगलादेश १९.३ षटकांत १२७ धावांतच गारद झाला. १६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात चांगली झाली नाही. जसप्रीत बुमराहने तन्झिद हसनला १ धावात ४ धावा देत बाद केले. तिसऱ्या क्रमांकावर खेळताना परवेझ हुसेन इमोनने सलामीवीर सैफ हसनसोबत दुसऱ्या विकेटसाठी ४२ धावा जोडल्या. परवेझ २१ धावा करून बाद झाला. त्यानंतर नियमित अंतराने बांग्लादेशचे फलंदाज बाद होत गेले. पण सलामीवीर सैफ हसनने ५१ चेंडूत ५ षटकार आणि ३ चौकारांसह ६९ धावा केल्या. बांगलादेशच्या विजयासाठी त्याचे एकहाती प्रयत्न पुरेसे नव्हते. सैफ आणि परवेझ व्यतिरिक्त इतर कोणताही फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकला नाही. संघ १९.३ षटकांत १२७ धावांतच ऑलआऊट झाला. भारताकडून जसप्रीत बुमराहने शानदार गोलंदाजी केली, ४ षटकांत १८ धावांत २ विकेट्स घेतल्या. कुलदीप यादवने ४ षटकांत १८ धावांत ३ विकेट्स घेतल्या आणि वरुण चक्रवर्तीने ४ षटकांत २९ धावांत २ विकेट्स घेतल्या. अक्षर पटेल आणि तिलक वर्मा यांनी प्रत्येकी एकेक विकेट घेतली. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारतीय संघाने ६ विकेट्स गमावून १६८ धावा केल्या. शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि ६.२ षटकांत पहिल्या विकेटसाठी ७७ धावा जोडल्या. मधल्या फळीतील फलंदाज याचा फायदा उठवू शकले नाहीत. सतत विकेट्स गमावल्याने धावगतीवर परिणाम झाला. अभिषेक शर्माने ३७ चेंडूत ७५ धावा केल्या. ज्यात पाच षटकार आणि सहा चौकारांचा समावेश होता. हार्दिक पंड्याने २९ चेंडूत ३८ धावा केल्या आणि गिलने १९ चेंडूत २९ धावा केल्या. शिवम दुबेने २, कर्णधार सूर्यकुमार यादवने ५ आणि तिलक वर्मा यांनी ५ धावा केल्या. अक्षर पटेल १० धावांवर नाबाद राहिला.






