
नवी दिल्ली : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला की, रेल्वेच्या गट ‘क’ (ग्रुप-सी) आणि गट ‘ड’ (ग्रुप-डी) स्तरावरील कर्मचाऱ्यांना यावर्षी ७८ दिवसांचा बोनस दिला जाईल. या निर्णयामुळे देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांच्या तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या निर्णयाचा सुमारे ११.५ लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. बोनसची रक्कम थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल आणि त्याचे वितरण लवकरच सुरू होणार आहे.
बोनस देण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये ट्रॅक मेंटेनर, लोको पायलट, ट्रेन मॅनेजर (गार्ड), स्टेशन मास्तर, पर्यवेक्षक, तंत्रज्ञ (टेक्निशियन), टेक्निशियन हेल्पर, पॉईंट्समन, मिनिस्ट्रियल स्टाफ अन्य गट ‘क’ चे कर्मचारी रेल्वेतील नॉन-गझेटेड कर्मचाऱ्यांना दरवर्षी बोनस देण्यात येतो, ज्याला उत्पादकता आधारित बोनस असे म्हणतात.
हा बोनस त्यांच्या कामगिरीशी संबंधित असतो आणि प्रत्येक वर्षी सणांच्या आधी दिला जातो. हा निर्णय रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कष्टांची दखल घेतल्याचे प्रतिक मानले जात असून सणासुदीच्या काळात त्यांच्या आर्थिक स्थैर्याला हातभार लावणारा ठरणार आहे.