या लेखात आपण सायबर क्राईम म्हणजे काय, त्याचे प्रकार, अशा गुन्हेगारांची मानसिकता आणि त्यापासून बचाव करण्यासाठीच्या उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. सायबर क्राईम म्हणजे काय तर संगणक, मोबाईल, इंटरनेट आणि इतर डिजिटल उपकरणांचा वापर करून केला जाणारा कोणताही गुन्हा म्हणजे 'सायबर क्राईम'. यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर एकतर गुन्हा करण्याचे साधन म्हणून किंवा गुन्ह्याचे लक्ष्य म्हणून केला जातो. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, इंटरनेटच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करणे, त्यांना त्रास देणे, त्यांची वैयक्तिक माहिती चोरणे किंवा कोणत्याही प्रकारची अवैध कृती करणे याला सायबर क्राईम म्हणतात.
आज आपण डिजिटल युगात जगत आहोत. इंटरनेट आणि तंत्रज्ञानाने आपले जीवन सोपे, वेगवान बनवले आहे. पण याच तंत्रज्ञानाच्या नाण्याला दुसरी बाजूही आहे, ती म्हणजे 'सायबर क्राईम'. सायबर क्राईम हा एक असा अदृश्य शत्रू आहे जो कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणाहून आपल्या वैयक्तिक, आर्थिक, भावनिक आणि सामाजिक जीवनावर हल्ला करू शकतो. दररोज बातम्यांमध्ये आपल्याला सायबर संबंधित गुन्हेगारीच्या घटना पाहायला मिळतात. शेअर मार्केट, ट्रेडिंग, लकी ड्रॉ, पैसे दामदुप्पट करणे, फसवे कॉल करून लोकांकडून ओटीपी, पिन नंबर, बँक खाते तपशील मिळवणे, लोकांचे नाव, पत्ते मिळवणे यांसारख्या घटनांनी समाजात धुमाकूळ घातला आहे. अगदी हुशार सुशिक्षित व्यक्ती सुद्धा अशा गुन्हेगारीला बळी पडताना दिसतो. खोट्या वेबसाईट बनवून, सामाजिक माध्यमातून खोटे अकाउंट बनवून, स्वतःची खोटी ओळख दाखवून डिजिटल अरेस्टची धमकी देणे त्यामार्फत लाखो रुपये लुबाडणे, साध्या सभ्य लोकांना ब्लॅकमेल करणे, खोट्या नावाने, बनावट फोटो वापरून सोशल मीडिया अकाउंट तयार करून मैत्रीसाठी मागणी करणे, लोकांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक करणे, या गोष्टी नित्याच्या आहेत. सायबर क्राईमचे प्रमुख प्रकार जाणून घेणे आवश्यक आहे. लोकांना फसवण्यात सायबर गुन्हेगार पटाईत असतात. सायबरच्या गुन्ह्यांचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.
'फिशिंग' हा सर्वात सामान्य प्रकार आहे. यामध्ये गुन्हेगार बनावट ईमेल, मेसेज किंवा वेबसाईट तयार करून लोकांना त्यांची वैयक्तिक माहिती देण्यास भाग पाडतात. हे संदेश इतके खरे वाटतात, की सामान्य माणूस सहज फसतो आणि आपली माहिती पुरवतो. दुसरा प्रकार म्हणजे रॅन्समवेअर या प्रकारात हॅकर्स तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलमधील सर्व डेटा एका विशिष्ट सॉफ्टवेअरच्या मदतीने लॉक करतात. तो डेटा परत मिळवण्यासाठी ते तुमच्याकडे पैशांची मागणी करतात, जी सहसा क्रिप्टोकरन्सीमध्ये मागितली जाते, ही करंसी अधिकृत नसते. 'सायबर बुलिंग आणि छळ' म्हणजे सोशल मीडिया किंवा इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर एखाद्या व्यक्तीला हेतुपुरस्सर त्रास देणे, धमकी देणे, अपमानास्पद टिप्पणी करणे याला सायबर बुलिंग म्हणतात. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणीही याचे बळी ठरू शकतात. आपली बदनामी होईल या भीतीने अनेकजण समोरच्याला मागेल ती रक्कम देऊ करतात. 'ओळख चोरी' यामध्ये गुन्हेगार तुमची वैयक्तिक माहिती चोरून स्वतःची ओळख म्हणून वापरतात. या माहितीचा वापर करून ते बँक खाते उघडणे, कर्ज घेणे, तुमच्या ओळखीच्या लोकांकडून पैसे मागणे, कोणत्याही चुकीच्या गोष्टीची मागणी करणे किंवा इतर बेकायदेशीर कामे करू शकतात.
'ऑनलाइन फसवणूक' ऑनलाइन शॉपिंग, नोकरीचे आमिष, लॉटरी लागल्याचे सांगणे, बनावट वेबसाइट्सच्या माध्यमातून खराब दर्जाच्या वस्तू विकणे अशा अनेक प्रकारे लोकांची आर्थिक फसवणूक केली जाते. 'हॅकिंग' कोणत्याही व्यक्तीच्या परवानगीशिवाय तिच्या संगणक प्रणाली, नेटवर्क किंवा खात्यामध्ये प्रवेश करणे म्हणजे हॅकिंग. हॅकिंगचा उद्देश माहिती चोरणे, प्रणालीचा गैरवापर करणे हा असतो. अनेकदा आपण ऐकतो की लोकांचे मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप हॅक झाले. त्यातील महत्त्वाची माहिती डिलीट झाली अथवा त्या माहितीचा गैरवापर करण्यात आला.
'मालवेअर हल्ला' मालवेअर हे एक प्रकारचे धोकादायक सॉफ्टवेअर आहे जे तुमच्या नकळत तुमच्या डिव्हाइसमध्ये म्हणजेच कॉम्प्युटर, लॅपटॉप अथवा मोबाईलमध्ये इन्स्टॉल होते आणि तुमची माहिती चोरते किंवा डिव्हाइसचे नुकसान करते. 'फेक न्यूज आणि द्वेष पसरवणे' सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी किंवा विशिष्ट हेतूने खोट्या बातम्या आणि द्वेषपूर्ण संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवणे हा देखील एक गंभीर सायबर गुन्हा आहे. अनेकदा जातीय भेदभाव, धार्मिक तेढ, कोणत्याही जात धर्म, पंत, प्रांत याबद्दल जाणूनबुजून आवमानकारक, चुकीचा संदेश, फोटो, व्हिडीओ प्रसारित करून समाजात दंगल, अशांतता घडवून आणण्यासाठी हा प्रकार वापरला जातो.
सायबर गुन्हेगारांची मानसिकता आणि मानसशास्त्रीय कारणे लक्षात घेणे गरजेचे आहे. सायबर गुन्हे करणाऱ्या लोकांची मानसिकता गुंतागुंतीची असते. यामागे अनेक मानसशास्त्रीय कारणे असू शकतात. 'आर्थिक लालसा' म्हणजेच कमीत कमी श्रमात झटपट श्रीमंत होण्याची इच्छा हे सायबर गुन्हेगारीमागील सर्वात मोठे कारण आहे. यासाठी ऑनलाईन मार्गातून आर्थिक गुन्हे केले जातात. नोकरीवरून काढून टाकलेला एखादा कर्मचारी कंपनीवर सूड उगवण्यासाठी तिच्या सिस्टमवर हल्ला करू शकतो. वैयक्तिक संबंधात दुखावलेली व्यक्ती समोरच्याची बदनामी करण्यासाठी सायबर बुलिंग किंवा रिव्हेंज पॉर्नसारख्या मार्गांचा अवलंब करते. राजकीय, सामाजिक, प्रशासकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कार्यकर्तृत्वाने अनेक विरोधक तयार झालेले असतात. अशावेळी कोणाचीही सामाजिक प्रतिमा मलीन करण्यासाठी, कोणाच्याही चांगल्या कामाला गालबोट लावण्यासाठी, चारित्र्य हनन करण्यासाठी हा सायबर अपराध केला जातो. 'शक्ती प्रदर्शन आणि अहंकार' म्हणजेच काही हॅकर्स केवळ आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी, प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा 'मी हे करू शकतो' या अहंकारी भावनेतून मोठ्या कंपन्यांच्या किंवा सरकारी वेबसाइट्स हॅक करतात. त्यांना यात एक प्रकारचे थ्रिल वाटते. आपल्या ज्ञानाचा, हुशारीचा वापर योग्य आणि चांगल्या कामासाठी करण्यापेक्षा काहीजण चुकीच्या मार्गात बुद्धिमत्ता वापरून स्वतःला काहीतरी वेगळे दाखवण्यासाठी गुन्ह्यांची ही पद्धत वापरतात. 'अनामिकतेचा गैरफायदा' घेणे जसे की इंटरनेटवर आपली ओळख लपवता येते, या गैरसमजामुळे गुन्हेगारांना आपण पकडले जाणार नाही, असे वाटते. या अनामिकतेच्या बुरख्याआड ते कोणत्याही थराला जाऊन गुन्हा करतात. सायबर गुन्हे रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना काय आहेत हे समजावून घेणे आवश्यक आहे. सायबर क्राईम रोखणे ही केवळ पोलिसांची किंवा सरकारची जबाबदारी नाही, तर ती आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी वैयक्तिक, संस्थात्मक आणि शासकीय स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक आहे. वैयक्तिक स्तरावरील उपाययोजना जसे मजबूत पासवर्ड ठेवणे. आपल्या सर्व ऑनलाइन खात्यांसाठी मोठे आणि वेगवेगळे पासवर्ड ठेवा. टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन जिथे शक्य असेल तिथे चालू करा. यामुळे पासवर्ड चोरला गेला तरी तुमचे खाते सुरक्षित राहते. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. ईमेल, व्हॉट्सॲप किंवा मेसेजमध्ये आलेल्या कोणत्याही संशयास्पद किंवा अनोळखी लिंकवर क्लिक करणे टाळा. सॉफ्टवेअर अपडेट ठेवा. तुमचा मोबाईल, कॉम्प्युटर आणि अँटीव्हायरस सॉफ्टवेअर नेहमी अपडेटेड ठेवा. सार्वजनिक वाय-फायचा वापर टाळा. सार्वजनिक ठिकाणी मिळणाऱ्या मोफत वाय-फायवर बँकिंग किंवा महत्त्वाची कामे करू नका. वैयक्तिक माहिती शेअर करू नका. जागरूक राहा म्हणजे ऑनलाइन लॉटरी, नोकरीची आकर्षक आमिषे किंवा अविश्वसनीय ऑफर्सपासून सावध राहा. कोणतीही फसवी स्कीम, बक्षीस, ऑनलाईन मिळणारे आर्थिक फायदे, विविध गेम्स, अनोळखी एप्लिकेशन, काहीही डाऊनलोड करणे यापासून सावध राहा.
शासकीय आणि सामाजिक स्तरावरील उपाययोजना कोणत्या आहेत ते समजावून घेऊ. सायबर क्राईमचे व्यापक स्वरूप लक्षात घेता कठोर कायदे अस्तित्वात असणे अपेक्षित आहे. सायबर गुन्हेगारांना कठोर शिक्षा होण्यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल करणे आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. सायबर पोलीस दलाचे सक्षमीकरण होणे अनिवार्य आहे. सायबर पोलिसांना आधुनिक तंत्रज्ञान, साधने आणि प्रशिक्षण देऊन अधिक सक्षम बनवणे आज काळाची गरज आहे. सायबर गुन्हेगारापर्यंत पोहचणे अवघड असल्यामुळे गुन्हेगार अगदी बिनधास्त आणि बेधडक असतात. तांत्रिक बाबतीत इतरांपेक्षा खूप हुशार असल्यामुळे हे गुन्हेगार सहजासहजी सापडणे एक आव्हान असते. यासाठी आपल्या पोलीस प्रशासनाला देखील तितकेच उच्च स्तरीय साधने उपलब्ध असणे गरजेचे आहे. सर्वात महत्वाचे आहे अवेअरनेस म्हणजेच जनजागृती मोहीम राबवणे. गुन्हा घडून गेल्यावर पच्छाताप करण्यापेक्षा असे गुन्हे घडूच नाहीत यासाठी सतर्क राहणे योग्य आहे. तंत्रज्ञान हे एक दुधारी शस्त्र आहे. त्याचा योग्य वापर केल्यास ते विकासाचे साधन बनते, पण गैरवापर केल्यास ते विनाशाचे कारण ठरू शकते. सायबर क्राईम हा असाच एक विनाशकारी गैरवापर आहे. या अदृश्य शत्रूचा सामना करण्यासाठी केवळ कायदे किंवा पोलीस पुरेसे नाहीत, तर प्रत्येक नागरिकाने डिजिटल साक्षर आणि जागरूक असणे अत्यंत आवश्यक आहे.
- मीनाक्षी जगदाळे