
महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर होऊन त्यावर हरकती-सूचनांची सुनावणी झाली आहे. त्यामुळे सर्व पक्षांतील इच्छुक तयारीला लागले आहेत. आतापासूनच स्वतःची व्होट बँक तयार करण्यासाठी आणि मतदारांना आर्कषित करण्यासाठी नवरात्र उत्सव डोळ्यांसमोर ठेवून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. इच्छुकांनी आता कोल्हापूरच्या महालक्ष्मीदेवीसह विविध ठिकाणी देवदर्शन सहलीचे आयोजन केले आहे. हे सध्या नवे फंडे व्होट बँकसाठी तयार करण्यात आले आहेत.
पुणे महापालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून, शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. विविध राजकीय पक्षांचे इच्छुक नगरसेवक आपल्या वॉर्डमध्ये मतदारांची मने जिंकण्यासाठी अनेक उपक्रमांची आखणी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर, मतदारांचे लक्ष वेधून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार प्रयत्न करत आहेत. पुणे शहर झपाट्याने वाढत असून त्यासोबत अनेक नागरी समस्या निर्माण झाल्या आहेत. रस्त्यांची दुरवस्था, कचऱ्याचे नियोजन, वाहतूक कोंडी, पाणीटंचाई असे प्रश्न इच्छुक उमेदवार हे प्रश्न आपल्या प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवत आहे. स्थानिक पातळीवर त्यांनी ‘डोअर टू डोअर' अभियान सुरू केले असून, नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्या दूर करण्याचे आश्वासन दिले जात आहे. काही ठिकाणी प्रत्यक्ष कचरा उचल, पाणी टंचाईवर तात्पुरते उपाय, गटारांची सफाई यांसारख्या कामांमध्ये इच्छुक स्वतः सहभागी होताना दिसत आहेत.
सामाजिक संघटनांशी जोडणी
विविध समाजिक, धार्मिक व सांस्कृतिक संस्थांशी संबंध प्रस्थापित करणे ही देखील एक महत्त्वाची रणनीती असते. इच्छुक नगरसेवक वेगवेगळय़ा समाजघटकांशी संपर्क वाढवत असून, गणेशोत्सव मंडळे, हाऊसिंग सोसायट्यांचे अध्यक्ष, महिला बचतगट, युवक मंडळे यांच्यासोबत बैठकांचे आयोजन केले जात आहे. या बैठकीतून नागरिकांच्या समस्या समजून घेण्यासोबतच, इच्छुक त्यांचे ‘व्होट बँक' म्हणून बळकट समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. काही ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, महिला मेळावे आयोजित करून जनसंपर्क वाढवले जात आहे. आजच्या काळात सोशल मीडिया खूप अॅक्टिव्ह झाला आहे. डिजिटल युगात सोशल मीडियाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. इच्छुक उमेदवारांनी फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, यूट्यूब अशा प्लॅटफॉर्मवर आपली उपस्थिती ठळकपणे दर्शवायला सुरुवात केली आहे. व्हिडीओ संदेश, फेसबुक लाईव्ह, रिल्स, ‘वर्क रिपोर्ट कार्ड' इत्यादी माध्यमांतून ते स्वतःची कार्यक्षम प्रतिमा सादर करत आहेत. विशेषतः युवा मतदारांशी जोडण्यासाठी 'इन्फ्लुएन्सर मार्केटिंग'चा वापरही काही इच्छुकांनी केला आहे. स्थानिक सोशल मीडियामार्फत सकारात्मक प्रचार केला जात आहे. काही उमेदवारांनी स्वतःची वेबसाईट तयार केली असून, मतदारांची समस्या नोंदवण्याची सोय दिली आहे. जाती-धर्माच्या समीकरणांची जुळवाजुळव करणं सुरू आहे. पुणे शहरामध्ये अनेक समाजघटक राहतात. इच्छुक उमेदवार आपल्या मतदारसंघातील सामाजिक समीकरणांचा अभ्यास करून त्यानुसार प्रचाराचे डिझाईन करत आहेत. काही ठिकाणी विशिष्ट समाजासाठी स्वतंत्र बैठकांचे आयोजन केले जात आहे. जनकल्याणकारी योजनांचे आयोजन केले जात आहे. विविध उपक्रमांद्वारे जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न होत असून, काही इच्छुकांनी मोफत आरोग्य शिबिरे, करिअर मार्गदर्शन सत्रे, वृद्ध नागरिकांसाठी सेवाभावी उपक्रम, महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण, विद्यार्थ्यांसाठी स्टेशनरी वाटप इत्यादी कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्याचप्रमाणे आधार कार्ड, पॅन कार्ड यांसारखे गरजेच्या असणाऱ्या गोष्टींचीही शिबिरे भरविण्यात येत आहेत. महिला व युवकांवर इच्छुक विशेष लक्ष केंद्रित करत आहे. महिलांची व युवकांची भूमिका निवडणुकीत निर्णायक ठरते. त्यामुळे त्यांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न होत आहे. महिला बचतगटांशी चर्चा, महिला आरोग्य तपासणी शिबिरे, स्वयंपाक स्पर्धा, इ. कार्यक्रम आयोजित करून महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन दिले जात आहे. युवकांसाठी मोबाईल गेम स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, करिअर गाइडन्स, सोशल मीडिया चॅलेंजेस या माध्यमांतून त्यांच्याशी संवाद साधला जात आहे. तर काही इच्छुक युवकांसाठी 'नेता घडवा' अभियान चालवत आहेत, ज्यातून भविष्यातील युवा नेतृत्व तयार करण्याचा दावा केला जातो. पक्षाच्या यंत्रणेचा वापर इच्छुकांकडून केला जात आहे. सत्ताधारी पक्ष असो वा विरोधक, पक्षांच्या यंत्रणा आता निवडणुकीच्या तयारीसाठी सज्ज झाल्या आहेत. इच्छुक उमेदवार आपल्या पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत संवाद वाढवत असून, कार्यकर्त्यांना संघटित करून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार मोहिमा आखल्या जात आहेत. ‘एक बूथ, दहा कार्यकर्ते' ही संकल्पना घेऊन अनेक ठिकाणी बूथ लेव्हल कमिटी तयार केल्या जात आहेत. यामार्फत मतदार यादीचे विश्लेषण, संभाव्य मतदारांची यादी, त्यांचा व्यक्तिगत संपर्क यावर भर दिला जात आहे. आतापासूनच स्वतःची व्होट बँक तयार करण्यासाठी आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी इच्छुकांकडून अनेक ठिकाणी देव दर्शनाच्या सहलींचे आयोजन केले जात आहे. त्यासाठी बस गाड्या, रेल्वेची सोय करण्यात येत आहे. पुणे महापालिका निवडणूक ही केवळ राजकीय ताकद आजमावण्याची संधी नसून, स्थानिक स्वराज्य संस्थांमधून प्रत्यक्ष विकासाची दिशा ठरवणारी प्रक्रिया आहे. इच्छुक नगरसेवक पदासाठी उमेदवार जे प्रयत्न करत आहेत, ते केवळ निवडणूक जिंकण्यासाठी नसून, मतदारांशी दीर्घकालीन नाते निर्माण करण्याचा एक मार्ग म्हणून पाहिले जात आहे. पण यामध्ये खरी कसोटी आहे ती ‘व्होट बँक'च्या माध्यमातून फक्त मत मिळवणे नव्हे, तर मतदारांचा विश्वास जिंकणे आणि तो विश्वास फक्त घोषणांनी नाही, तर कृतीने मिळवण्याचा उमेदवार प्रयत्न करत असतात.