Tuesday, September 23, 2025

सौंदर्यप्रसाधन क्षेत्रातील यशस्वी 'अंबिका'

सौंदर्यप्रसाधन क्षेत्रातील यशस्वी 'अंबिका'

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे

वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी लग्न, सात वर्षांत घटस्फोट, दोन वर्षांच्या मुलीचा एकल पालक म्हणून सांभाळ, १९९० मध्ये उद्योगात मैत्रिणीकडून दगा, तर १९९६ मध्ये दुसऱ्या मित्राकडून सलून व्यवसायात फसवणूक, पहिल्या उद्योगात ७ लाखांचे नुकसान अशा प्रकारे अनेकवेळा अपयश पाहून ती खचली नाही. पडली, पुन्हा उभी राहिली. हार न मानल्यानेच आज ती १० कोटींपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या कंपनीची सर्वेसर्वा आहे. ही संघर्ष कथा आहे सौंदर्य प्रसाधन क्षेत्रातील यशस्वी उद्योजिका अंबिका पिल्लई यांची.

२६ नोव्हेंबर १९६२ रोजी केरळमधील कोल्लम येथे अंबिकाचा जन्म झाला. अंबिकाला बालपणी डिस्लेक्सियाचा सामना करावा लागला. तिला लेखन करण्यात आणि गणित या विषयात अडचणी येत होत्या. तत्कालिन भारतीय परंपरेनुसार वयाच्या १७ व्या वर्षी तिचे लग्न झाले. मात्र लवकरच तिला वैवाहिक जीवनात निराशा सहन करावी लागली. सात वर्षांच्या वैवाहिक प्रवासानंतर २४ व्या वर्षी तिचा घटस्फोट झाला. दोन वर्षांच्या आपल्या तान्ह्या मुलीसह ती दिल्लीला गेली. करिअरच्या अनेक पर्यायांचा विचार केल्यानंतर, तिने हेअरस्टायलिस्टचा कोर्स करण्याचा निर्णय घेतला.

आपल्या मुलीला चांगले जीवन देण्याचा तिने दृढनिश्चय केला. अंबिकाचे वडील श्रीमंत होते पण तिने कधीही त्यांच्याकडून एक पैसाही घेतला नाही कारण तिला स्वतःच्या आयुष्यात काहीतरी करायचे होते. १९९० मध्ये, तिने एका सलूनमध्ये काम करायला सुरुवात केली. तिचा पगार २००० रुपये होता. यातील अर्धे पैसे घरभाड्याला जाई तर उरलेले अर्धे घरखर्चावर खर्च होत असे. काही महिने काम केल्यानंतर तिला जाणवले की आपण स्वतःचे सलून सुरू करू शकतो. तिने एका मैत्रिणीसोबत भागीदारी करण्याचा निर्णय घेतला पण त्या मैत्रिणीची एक अट होती की सलून तिच्या नावावर असले पाहिजे. ही अट मान्य करत अंबिकाने भागीदारी मध्ये व्यवसाय सुरू केला. वडिलांकडून ७ लाख रुपये कर्ज घेतले. अशाप्रकारे तिचे पहिले सलून १९९० मध्ये सुरू झाले.

सात वर्षांनंतर तिला सलूनच्या बँक खात्यांमध्ये गडबड वाटली. व्यवहारात तफावत दिसली आणि तिच्या मैत्रिणीशी तिचा वाद झाला. तिने मैत्रिणीसोबत व्यावसायिक भागीदारी रद्द करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिला ७ लाख रुपयांची गुंतवणूक परत मिळाली नाही. तिच्याकडे काहीही उरले नव्हते. पुन्हा शून्यापासून तिला सुरुवात करावी लागली. एका मैत्रिणीने तिला अपयश दिले, तर दुसऱ्या मित्राने तिला आधार दिला. फॅशन डिझायनर हेमंत त्रिवेदी हे अंबिकाचे चांगले मित्र आणि तिच्यासाठी आधारस्तंभ ठरले. त्या काळात दिल्लीत एखादा कार्यक्रम असेल तर मुंबईतील डिझायनर्स स्वतःचे हेअर ड्रेसर आणि मेकअप आर्टिस्ट घेऊन जायचे. अशाच एका कार्यक्रमासाठी हेमंत त्रिवेदी यांनी अंबिकाला हेअरस्टाईलिंग आणि मेकअपही करायला सांगितले. त्यानंतर दुसऱ्यांदा त्यांनी एकत्र काम केले ते ऐश्वर्या रायच्या 'ताल' चित्रपटासाठी. या चित्रपटातील मेकअपसाठी अंबिकाला आयफाचा (इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी) पुरस्कार मिळाला जो तिचा पहिला पुरस्कार होता.

१९९६ मध्ये, तिने पुन्हा एका मित्रावर विश्वास ठेवत त्याच्यासोबत भागीदारीमध्ये दिल्लीत सलून सुरू केले. पण त्यानेही तिला फसवले. एके दिवशी २२ वधूंचे मेकअप करण्यात आले होते; परंतु त्या दिवशीच्या अकाऊंटमध्ये फक्त दोनच मेकअपचा उल्लेख करण्यात आला होता.

२००८ मध्ये मात्र तिने स्वतःला सावरले. दुसरे कर्ज घेतले आणि अंबिका पिल्लई नावाने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय आता तिचा ब्रँड झाला आहे. यावेळी तिने व्यवहार पाहण्यासाठी सॉफ्टवेअर सिस्टम तयार केली. काही वर्षांच्या कालावधीत तिने संपूर्ण दिल्लीत १२ शाखा उघडल्या.

काही वर्षांपूर्वी अंबिकाने ‘कायत्र’ ही हर्बल उत्पादनांची श्रेणी सुरू केली. हेयर केअर, स्कीन केअर आणि मेकअप अशा वर्गातील उत्पादने तिच्याकडे उपलब्ध आहेत. २५० रुपयांपासून ते अगदी १,२५० रुपयांपर्यंत या उत्पादनांचे मूल्य आहे. २०१० मध्ये

११ कर्मचाऱ्यांसह आणि दिवसाला जेमतेम पाच क्लायंटसह सुरुवात केलेल्या, अंबिका पिल्लई डिझायनर सलून प्रायव्हेट लिमिटेड आज १५० कर्मचाऱ्यांसह १० कोटींपेक्षा अधिक रुपयांची उलाढाल करत आहे.

एक काळ असा होता जेव्हा अंबिका सकाळपासून रात्रीपर्यंत काम करत असे. मात्र आता तिचा वेग मंदावला आहे. तिने आयुष्यभर खूप कष्ट केले. इतके की तिच्या अंगठ्याला आणि गुडघ्याला दुखापत झाली होती. मात्र आता वयोमानानुसार तिने काम कमी केले आहे. ती आता फक्त १२ ते ५ काम करते. कोरोना काळात तिने दिल्लीतील बहुतेक सलून बंद केले आहेत.

भविष्यातील तिच्या काही योजना आहेत. काही वर्षांत तिला निवृत्त व्हायचे आहे आणि स्वतःचे रेस्टॉरंट सुरू करायचे आहे. प्रवास करायचा आहे. पुस्तके लिहायची आहेत. अशा गोष्टी करायच्या आहेत ज्यासाठी तिला कधीही वेळ देता आला नव्हता. तिची मुलगी कविता नुकतीच कंपनीत भागीदार म्हणून सामील झाली आहे. जनरल मॅनेजर म्हणून कंपनीची धुरा ती सांभाळत आहे.

आज अंबिका सौंदर्य प्रसाधन क्षेत्रातील प्रसिद्ध नाव आहे. फेसबुक पेजवर ती सौंदर्य विषयक टिप्स आणि ट्रिक्स उदारपणे शेअर करते. तब्बल ८.९९ लाख लोक तिला फॉलो करतात. तिने २००७ मध्ये भारत निर्माण सुपर अचिव्हर्स अॅवॉर्ड, २००९ मध्ये बेस्ट हेअर अँड मेकअपसाठी कॉस्मोपॉलिटन फन फियरलेस फीमेल अॅवॉर्ड आणि २०११ मध्ये व्होग बेस्ट मेकअप आर्टिस्ट अॅवॉर्ड असे अनेक पुरस्कार जिंकले आहेत. इतकं अपयश पचवून यशस्वी झालेल्या अंबिका पिल्लई प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणादायी आहेत.

Comments
Add Comment