
नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनात आज (मंगळवार, २३ सप्टेंबर) ७१ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. या भव्य सोहळ्यास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहिल्या आणि त्यांच्या हस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते बॉलिवूडच्या किंग शाहरुख खानकडे. तब्बल ३३ वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी करिअरनंतर शाहरुख खानला अखेर पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्काराचा मान मिळाला आहे. त्याला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ हा प्रतिष्ठेचा किताब प्रदान करण्यात आला. बॉलिवूडमध्ये रोमांसचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खानने या सन्मानाने स्वतःच्याच यशाची नवीन पर्वणी रचली आहे. चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर तीन दशकांहून अधिक काळ शाहरुखने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. राष्ट्रीय पुरस्काराने त्याच्या करिअरची सुवर्णमुद्रा ठरल्याचे बोलले जात आहे.
शाहरुखच्या खास लूकने खेचली सगळ्यांची नजर
७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात शाहरुख खानने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला. ‘जवान’ या सुपरहिट चित्रपटातील त्याच्या दमदार भूमिकेसाठी शाहरुखला हा मान मिळाला. पुरस्कार स्वीकारण्यासाठी शाहरुख खान खास लूकमध्ये मंचावर हजर झाला. डॅशिंग सूट-बूटमध्ये तो नेहमीप्रमाणेच उठून दिसत होता. मात्र यावेळी त्याचे केस पांढरे झळकत होते, ज्यामुळे त्याचा लूक अधिकच वेगळा वाटत होता. शाहरुखने मंचावर प्रवेश करताच दोन्ही हात जोडून प्रेक्षकांना नमस्कार केला. त्याच्या या साध्या आणि मनमिळाऊ कृतीने उपस्थितांचे मन जिंकले. टाळ्यांच्या गजरात शाहरुखने राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला आणि या क्षणी त्याच्या दीर्घ कारकिर्दीला एक ऐतिहासिक शिखर लाभलं.

कोल्हापूर: ११ दिवसांचा नवरात्रोत्सव आज 'करवीर निवासिनी' अंबाबाई, श्री महालक्ष्मी मंदिरात 'घटस्थापना'सह उत्साहात सुरू झाला. 'श्री पूजक' माधव मुनिश्वर ...
जवान’मध्ये शाहरुख खानची दुहेरी कमाल
‘जवान’ हा चित्रपट ७ सप्टेंबर २०२३ रोजी प्रदर्शित झाला आणि प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. या सिनेमात शाहरुखने दुहेरी भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली. त्याने सैन्य अधिकारी विक्रम राठोड आणि त्याचा जेलर मुलगा आजाद या दोन भिन्न व्यक्तिरेखा साकारल्या. साऊथचे दिग्दर्शक ॲटली कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. सिनेमात शाहरुखसोबत दीपिका पादुकोण, नयनतारा, सान्या मल्होत्रा आणि साऊथचा दमदार अभिनेता विजय सेतुपती यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. ॲक्शन, ड्रामा, भावना आणि स्टार पॉवरचा संगम असलेला हा सिनेमा प्रेक्षकांसाठी एका पर्वणीसारखा ठरला. ‘जवान’ने केवळ शाहरुखच्या अभिनय कौशल्यावर शिक्कामोर्तब केलं नाही तर हिंदीपटसृष्टीला नवीन उंची गाठून दिली.
७१व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडचा जलवा
शाहरुख खानला ‘जवान’ या सुपरहिट सिनेमासाठी आणि विक्रांत मेसीला ‘१२वी फेल’साठी संयुक्तरित्या सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शाहरुखच्या कारकिर्दीतील हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार ठरला असून, त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. तर अभिनेत्री राणी मुखर्जीला ‘मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे’ या भावस्पर्शी कथानक असलेल्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं आहे. या चित्रपटात राणीने एका आईची झुंज आणि तिच्या मुलांसाठी केलेला संघर्ष प्रभावीपणे साकारला होता. या तिन्ही कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आणि राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवत त्यांना सन्मान मिळाला आहे.