Monday, September 22, 2025

जयंत पाटिल यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट

जयंत पाटिल यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट

दक्षिण महाराष्ट्राचे राजकारण गेल्या काही दिवसांत एका वक्तव्यामुळे प्रचंड ढवळून निघाले आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत तालुक्यातील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट)े माजी प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर केलेली वैयक्तिक टीका राज्यभरातील राजकीय वातावरण तापवून गेली. पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या वडिलांचा उल्लेख करत केलेले विधान हे केवळ व्यक्तीवरचा हल्ला नसून संपूर्ण पाटील कुटुंबाच्या प्रतिष्ठेवर घाव घालणारे असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे या संघर्षात जयंत पाटील यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट आहे.

पाटील कुटुंबाची दक्षिण महाराष्ट्रात सहकार क्षेत्रातील प्रचंड पकड आहे. स्व. राजारामबापू पाटील यांनी या भागात सहकाराचा पाया रचला आणि जयंत पाटील हे त्याचे वारसदार म्हणून आजही लोकांच्या मनात आदराचे स्थान राखून आहेत. त्यांचा शांत, संयमी आणि मुद्देसूद वक्ता म्हणून असलेला ठसा जनमानसात खोलवर रुजलेला आहे. त्यामुळे पडळकर यांच्या वक्तव्यामुळे पाटील यांची प्रतिमा आणखी दृढ झाली असून, लोकांमध्ये त्यांच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली आहे. या वादाची पार्श्वभूमी पाहता, जत तालुक्यात एका सरकारी अभियंत्याच्या आत्महत्येप्रकरणी पडळकर यांच्यावर आरोप झाले होते. त्यावरून महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी आंदोलन छेडले. यामध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी एकत्र येऊन पडळकर यांच्यावर तोफ डागली. संतापाच्या भरात पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर वैयक्तिक टीका केली आणि वाद अधिक भडकला. यामुळे महाविकास आघाडीला एकत्र येण्यासाठी मुद्दा मिळाला, तर भाजपला बचावात्मक भूमिका घ्यावी लागली. वाद उफाळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर आंदोलने केली. पडळकरांच्या प्रतिमा जाळण्यात आल्या. जितेंद्र आव्हाड यांनी हे वक्तव्य महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशावरचा आघात असल्याचे म्हटले. काँग्रेसचे सतेज पाटील, विजय वडेट्टीवार यांच्यासह रोहित पवार आणि अमोल कोल्हे यांनीही तीव्र निषेध नोंदवला. इतकेच नव्हे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भाजपला कानपिचक्या दिल्या. पडळकर यांनी मात्र माफी मागण्यास नकार दिला आहे. 'मी राजकीय मुद्द्यांवर बोललो, वैयक्तिक नाही,' असे ते ठामपणे सांगतात. पण त्यांच्या या भूमिकेमुळे भाजपमध्येही अस्वस्थता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकरांना समज दिल्याचे सांगितले असले, तरी भाजपमधील कोणीही मोठा नेता खुलेपणे त्यांच्या बाजूने उभा राहिलेला नाही. उलट, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकते, असे मत व्यक्त होत आहे.

या संपूर्ण प्रकरणात महत्त्वाचे म्हणजे जयंत पाटील यांनी शांतता आणि संयमाची भूमिका घेतली आहे. त्यांनी थेट प्रतिक्रिया न देता, आपल्या परिपक्व राजकीय शैलीत या वादाला उत्तर दिले आहे. यामुळे त्यांच्याविषयी लोकांमध्ये आदर अधिकच वाढला आहे. 'टप्प्यात आला की कार्यक्रम करतो' असे ठसठशीत वक्तव्य करणारे आणि आवश्यकतेनुसार विरोधकांना चपखल उत्तर देणारे जयंत पाटील यांना असा वैयक्तिक हल्ला सहन करावा लागल्याने सामान्य लोकांतून त्यांना सहानुभूती मिळत आहे. सोमवारी सांगलीत होणाऱ्या मोर्चात स्वतः प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे जयंत पाटील यांच्या बाजूने उभे राहणार आहेत. यामुळे या संघर्षाला प्रादेशिक पातळीवरच नव्हे तर राज्यव्यापी रंग मिळणार आहे. दक्षिण महाराष्ट्रातील सहकाराची ताकद, जयंत पाटील यांचा शांत स्वभाव आणि पडळकर यांची आक्रमक प्रतिमा या सगळ्या घटकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद निवडणुकांपर्यंत तापत राहील, यात शंका नाही. पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजपला ओबीसी-मराठा समाजातील तणावाचा सामना करावा लागू शकतो, तर जयंत पाटील यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट निर्माण होऊन त्यांचा राजकीय दरारा अधिक मजबूत होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पडळकर दोन पावले मागे येतात का, भाजप कारवाई करते का आणि मुख्यमंत्री एकूण काय भूमिका घेतात याकडे आता दक्षिण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

राजकीय खेळीचे सूत्र सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेला संस्कृती बचाव महामोर्चा हा फक्त सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न नाही, तर त्यामागे ठळक राजकीय गणितेही दडलेली दिसतात. त्यासाठीच हजारो लोकांना सांगलीत निमंत्रित करण्यात आले. राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील सगळे नेते शिवाय मित्र पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांना विनंती करून निमंत्रित करण्यात आले त्यानुसार प्रचंड गर्दीही जमली. सांगली व परिसर हा ऐतिहासिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरेसाठी प्रसिद्ध आहे. येथील लोकसंस्कृती, नाट्यकला, साहित्य आणि शैक्षणिक संस्था या शहराची ओळख आहे. अशा ठिकाणी संस्कृती धोक्यात आहे असा सूर लावून राष्ट्रवादीने मोर्चा उभारणे हे थेट राजकीय संदेश देणारे पाऊल आहे.

महाविकास आघाडीतील अंतर्गत ताणतणाव, भाजपची वाढती घुसखोरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील समीकरणे या सर्वांचा विचार करता, राष्ट्रवादीसाठी हा मोर्चा हा स्वतःची ताकद दाखवण्याचा प्रयत्न ठरतो. संस्कृती या भावनिक मुद्द्याचा आधार घेऊन जनतेचे लक्ष वेधणे आणि त्यामागे सत्ताधाऱ्यांची अकार्यक्षमता दाखवणे, हे उद्दिष्ट स्पष्ट दिसते. विशेषतः तरुणाई आणि बुद्धिजीवी वर्गात राष्ट्रवादीची पकड मजबूत करण्यासाठी ‘आपली संस्कृती धोक्यात’ हा मुद्दा सोपा आणि परिणामकारक ठरतो. यामागे आणखी एक खेळी म्हणजे स्थानिक नेत्यांचे वर्चस्व निर्माण करणे.

सांगलीत काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादीचे गटांतर अनेकदा चर्चेत असते. त्यामुळे या मोर्चाच्या माध्यमातून स्थानिक नेते आपली जनाधारशक्ती दाखवू शकतील, पुढील महापालिका व विधानसभा निवडणुकांपूर्वी पक्षश्रेष्ठींना आपले राजकीय वजन दाखवता येईल. थोडक्यात, राष्ट्रवादीचा संस्कृती बचाव महामोर्चा हा सामाजिक-सांस्कृतिक आवाहन असले, तरी त्यामागील खरी ताकद ही राजकीय समीकरणे बदलण्याची धडपड आहे. संस्कृतीच्या रक्षणाच्या नावाखाली मतदारांना एकत्र आणणे, विरोधकांना कोपरखळी देणे आणि आगामी निवडणुकांची पूर्वतयारी करणे हेच या खेळीचे मुख्य उद्दिष्ट म्हणता येईल.

Comments
Add Comment