Monday, September 22, 2025

वाक् - संप्रदायिनी

वाक् - संप्रदायिनी

वैशाली गायकवाड

अनुदीनी आपल्या दिवाणखान्यात भारदस्त आणि प्रभावी आवाजाने आपले लक्ष वेधून घेणाऱ्या, आकाशवाणी व दूरदर्शनच्या वृत्तनिवेदिका, सूत्रसंचालिका, गेली तीन दशके विविध माध्यमांतून आपला असामान्य आवाज, लेखणी आणि मंचकौशल्याने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करणाऱ्या आजच्या आपल्या कर्तृत्ववान राज्ञी ‘शिबानी जोशी’.

नवरात्र उत्सवाच्या चैतन्यमयी वातावरणात आपण या ‘शब्द सरस्वतीचे’ कार्य जाणून घेऊया. सांस्कृतिक कार्यक्रमांचे माहेरघर असणाऱ्या विलेपार्ले येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील सरकारी नोकरीतील सेवेत व आई मुख्याध्यापिका होती. आईच्या संस्कारांमुळे पार्ले टिळक शाळेपासूनच अनेक स्पर्धा, उपक्रमांमध्ये त्यांचा विशेष सहभाग होता. त्यांनी डहाणूकर कॉलेजमध्ये असताना नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

वयाच्या अठराव्या वर्षीच स्टाफ सिलेक्शन, शासकीय सेवेसाठी लागणाऱ्या सगळ्या स्पर्धा त्या उत्तीर्ण झाल्या होत्या. त्याच्यातूनच वयाच्या १९व्या वर्षी वडिलांच्या सल्ल्यानुसार त्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सेवेसाठी रुजू झाल्या. शिबानी जोशी यांनी वाणिज्य शाखेत पदवी घेतली असली तरी निवेदन, नाटक, वृत्तनिवेदन या क्षेत्रातील आवड जपण्यासाठी त्यांनी मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पत्रकारितेचा विशेष अभ्यास आणि नाट्यशास्त्रातील डिप्लोमा तसेच बँकिंग क्षेत्रासाठी त्यांनी आवश्यक असणारा संगणक डिप्लोमा देखील केला यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अभ्यासुता आणि व्यासंगीपणा स्पष्टपणे दिसून येतो. ही शैक्षणिक तयारी त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीचा मजबूत पाया ठरली.

१९९० पासून दूरदर्शनवर आणि १९९१ पासून आकाशवाणीवर सलग वृत्तनिवेदिका म्हणून कार्यरत असलेल्या शिबानी यांनी अत्यंत शिस्तबद्ध, व्यावसायिक आणि सुसंस्कृत निवेदनशैलीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. रेडिओ आणि टीव्ही या दोन्ही माध्यमांमध्ये त्यांच्या आवाजाचा ठसा उमटवलेला आहे. त्यांच्यातील कलागुण ओळखून कोणतेही काम समर्पित भावनेने करण्याची त्यांची कृतिशीलता बघून बँकेच्या प्रमोशनसाठी जाहिरात लेखन, नाटक लिहून ते बसवणे, सादर करणे, गावोगावी जाऊन बँकेच्या योजना पोहोचवणे, तसेच भोंडला, हळदीकुंकू अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमधून स्त्रियांमध्ये बँकेविषयीची असलेली भीती घालवून त्यांना जागरूक करणे, स्वयं सहायता गटासाठी कार्यक्रम असे विशेष उल्लेखनीय कार्य त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत अत्यंत उत्कृष्टपणे केले. आकाशवाणीवरील स्पॉन्सर्ड रेडिओ प्रोग्रॅम सादर करणे हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. अनेक उत्तम उत्तम स्पॉन्सर्ड प्रोग्रॅमचे लेखन-निवेदन त्या गेले २० वर्षे सातत्याने करत आहेत.

अभियंता असणारे निलेश जोशी यांच्याशी त्यांचा बघून सवरून विवाह झाला. एकपात्री नाटकातील सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावे असे नाव म्हणजेच सदानंद जोशी हे त्यांचे सासरे. त्यांची आवड जपणारे सासर त्यांना लाभल्याने त्या सक्रियरीत्या एका वेळेस विविध गोष्टींमध्ये स्वतःला सिद्ध करू शकल्या. त्या त्यांच्या सगळ्या प्रेरणादायी कारकीर्दीचे श्रेय स्वतःच्या सासूबाईंना देतात. कुटुंबासह सहकार्य मिळालं तर स्त्री आपल्या क्षेत्रात खूप पुढे जाऊ शकते. शिबानी ताईंना घरच्यांची उत्तम साथ लाभली.

त्यांनी नामवंत वृत्तपत्रांमध्ये गेली २५-३० वर्षे लेखन केले आहे. त्यांच्या लेखनातून त्यांनी अनेक व्यक्तींचे तसेच स्वयंसेवी संस्थांचे कार्य समाजासमोर आणले आहे. ‘भ्रमंती’ या दिवाळी अंकात त्या दोन-तीन वर्षे सहायक संपादक म्हणून कार्यरत होत्या. व्यास क्रिएशन प्रकाशन संस्थेसाठी बालखजिना या विशेष उपक्रमांतर्गत त्यांनी लहान मुलांसाठी देखील पुस्तके लिहिली आहेत. सदानंद जोशी यांच्या मी अत्रे बोलतोय या पुस्तकाचे संपादन त्यांनी केले आणि त्याचे प्रकाशन माननीय राज्यपाल महोदयांच्या हस्ते झाले होते. विको, DSK, कैमलिन, डॉ. गडदे, मराठे ज्वेलर्स, NKGSB बँक यांसारख्या कंपन्यांचे रेडिओ कार्यक्रम व जाहिरातींसाठी लेखन व निवेदन देखील त्या गेली २० वर्षे करत आहेत. भोंडल्याची गाणी हे त्यांचे पुस्तक देखील प्रकाशित झाले आहे.

सुरुवातीला विलेपार्ले इथे शिप आली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक नाट्य स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. मराठी एकांकिका, नाटके, चित्रपट, मालिका आणि नभोनाट्य यांमध्ये गेल्या ३० वर्षांपासून सातत्याने काम करत आहेत. कॉलेज जीवनात अभिनय स्पर्धांमध्ये त्यांना मिळालेले पुरस्कार हे त्यांच्या अभिनय प्रतिभेचे प्रमाण आहेत.

शिबानी जोशी यांनी १००० हून अधिक सरकारी व खासगी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे. शिवाजी पार्क येथील १ मे आणि २६ जानेवारीच्या मुख्य संचलनाचे सलग १५ वर्षे सूत्रसंचालन करण्याचा त्यांचा विक्रम उल्लेखनीय आहे. विविध शैक्षणिक संस्था, सांस्कृतिक मंडळे आणि राज्य शासनाच्या विशेष कार्यक्रमांमध्ये त्या निवेदन करतात.

कुटुंब, नोकरी, आवड या सगळ्याचा समन्वय साधणाऱ्या शिबानी यांनी ९२ साली झालेल्या बॉम्बस्फोटाच्या वेळी अत्यंत तणावपूर्ण वातावरणात देखील अनेक आव्हानांना तोंड देत बातम्या दिल्या आहेत. तसेच २६ जुलै या भर पावसाच्या दिवशी देखील त्यांनी त्यांचे न्यूज रिडर म्हणून कर्तव्य चोख बजावले होते. त्यांचा त्यांच्या कामाप्रीत्यर्थ असणारा आदर, त्यांच्या समर्पित भावना, सातत्य यामुळेच त्या गेली तीस वर्षे आकाशवाणीवर सातत्याने वृत्तनिवेदन करणाऱ्या महाराष्ट्रातील एकमेव वृत्तनिवेदिका ठराव्यात.

सलग तीस वर्षांचा त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ इतरांना देखील व्हावा याकरिता विविध निवेदन कार्यशाळांचे आयोजन आणि नामवंत महाविद्यालयांमध्ये व्याख्याने त्या देत असतात. लोपपावत चाललेल्या लोककलेला जागृत ठेवण्यासाठी, परंपरा जपत ‘भोंडला’, ‘हादगा’ आणि ‘भुलाबाई’ या पारंपरिक लोककलेचे त्यांनी स्वतःच्या चमूसह पुनरुज्जीवन केले आणि मॉरिशस, दिल्ली, सूरजकुंड मेळा यांसारख्या देश-विदेशातील ठिकाणी सादर करून महाराष्ट्राच्या परंपरेचा झेंडा उंचावला आहे. अनेक मोठमोठ्या संस्था, संघटना नवरात्रीमध्ये भोंडल्याचे कार्यक्रम आयोजित करतात यामुळे महिलांनाही या जुन्या परंपरा खेळण्याची संधी त्यातून मिळत असते. अनिल हर्डीकर यांच्याबरोबर हास्य मुद्रा हा द्विपात्री कार्यक्रम त्या करतात. या कार्यक्रमाचे शंभरहून अधिक शोज मॉरिशस, दुबई, दिल्लीपासून चेन्नईपर्यंत त्यांनी केले आहेत.

राज्य शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार त्यांना मिळाला आहे तसंच राज्य शासनाची मानद एसइओ ही पदवी त्यांना मिळाली आहे.आता त्या केंद्रीय फिल्म सेन्सॉर बोर्डाच्या सदस्य आहेत तसेच महाराष्ट्र राज्य नाट्य पुनिरीक्षण मंडळाच्या कार्यकारिणीमध्येही त्या सदस्य म्हणून कार्यरत आहेत.

आपला जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन विश्वसनीय, सकारात्मक आणि चांगला असेल तर खरंच जग चांगलं आहे. महिलांनी ठरवलं तर त्यांना अशक्य असं काहीच नाही. त्यामुळे महिलांनी स्वतःला कार्यरत ठेवून आपल्या कलागुणांना वाव देण्याचा मोलाचा सल्ला शिबानी सगळ्यांना देतात.

भविष्यकालीन संकल्पनांमध्ये नाटक क्षेत्रात काम करायला मिळाल्यास राहून गेलेली गोष्ट पूर्ण करण्याचा आनंद मिळेल असे शिबानी आवर्जून सांगतात. वेळ नाही ही सबब आहे. ‘जो जितका व्यस्त त्याच्याकडे उलट भरपूर वेळ असतो’ हा मंत्र जपत वेळेचं नियोजन केलं तर दिवसाला आपण १५ तास काम करू शकतो असं त्यांना वाटतं.

शिबानी जोशी यांचे कार्य केवळ एक वृत्तनिवेदिका, लेखिका किंवा सूत्रसंचालिका म्हणून मर्यादित नाही. त्या एक प्रेरणादायी नेतृत्वकर्त्या आहेत, त्या नवोदितांना दिशा देतात, परंपरेला नव्याने उजाळा देतात आणि प्रत्येक शब्दात, प्रत्येक सादरीकरणात मराठी भाषेची श्रीमंती जपतात. भेटता क्षणी स्वतःच्या हास्यमुद्रेने व ऊर्जेने सगळ्यांना आपलंसं करणाऱ्या या शब्दशारदेला शतशः नमन करून पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा!

Comments
Add Comment