
सोलापूर : पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू आहे. जनजीवन विस्कळीत झाले असून पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील म्हाड्यात सीना नदीचे पाणी गावात शिरले. ८ ते १० गावांमध्ये पाणी शिरले असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गावांना जोडणारे रस्ते देखील पाण्याखाली गेले आहेत.
करमाळा तालुक्यातील संगोबा मंदिरात ९० नागरिक अडकले आहेत. तहसीलदार शिल्पा ठोकळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉलद्वारे परिस्थितीची माहिती दिली. एनडीआरएफ आणि बोटींच्या सहाय्याने पुरात अडकलेल्या नागरिकांसाठी बचावकार्य राबवले जाणार असल्याची माहिती तहसीलदार शिल्पा ठोकळे यांनी दिली आहे.
सीना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. रावातील महिला आणि इतर नागरिक अडकले असून त्यात महसूल कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
सीना नदीला महापूर; सात तालुक्यांना फटका
सोलापूर जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला असून, आभाळ फाटल्यासारखी अतिवृष्टी सुरू आहे. सीना कोळेगाव, खासापुरी, भोगावती, चांदणी धरणातून सुमारे सव्वादोन लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सीना नदीत येत असल्याने महापुराचे संकट निर्माण झाले आहे. याचा फटका सोलापूर जिल्ह्यातील ७ तालुक्यांना बसत आहे.
सीना नदीत येत असलेल्या विसर्गाचा फटका माढा, करमाळा, बार्शी, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट तालुक्याच्या पश्चिम भागाला बसत आहे. त्यामुळे प्रशासनाने सोमवारी सकाळपासून नदीकाठीच्या गावी जाऊन नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरू केले होते.बार्शी तालुक्यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. गेल्या ५० वर्षांनंतर एवढा मोठा पाऊस पडल्याने चांदणी नदीला महापूर आला. हजारो हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेली. बार्शी-तुळजापूर रोड वाहतुकीसाठी बंद झाला.
चांदणी धरणातून ४८ हजार ५४१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सीना नदीत येत आहे. अतिवृष्टीमुळे चांदणी नदीला महापूर आल्याने बेलगाव, मांडेगाव, आगळगाव, धसपिंपळगाव, खडकलगाव, देवगाव, कांदलगाव आदी गावांत पाणी शिरले आहे. अनेक गावांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टी व पुरामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे पिकांबरोबर माती देखील वाहून गेली आहे.