
राज्यात नवरात्रीत पावसाचा तांडव!
सोलापूर : महाराष्ट्रात ऐन नवरात्रीत पावसाचा कहर पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या भागांत सलग मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला असून, काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, उभ्या पिकांवर पावसाचे पाणी साचल्याने शेती धोक्यात आली आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. दरम्यान, हवामान खात्याने राज्यासाठी नवा इशारा दिला आहे. २३ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील तब्बल ३१ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय ५ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, पुढील २४ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे राज्यात सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
22/09, 9 pm: Light to moderate intermittent spells over parts of marked areas during next 3,4 hrs at isolated places. Konkan possibility of light spells with occasional moderate type. Watch for IMD updates please. pic.twitter.com/iVVLltKqjs
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 22, 2025
५ जिल्ह्यांना ऑरेंज, तर ३१ जिल्ह्यांना यलो अलर्ट
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बीड, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, राज्यातील उर्वरित ३१ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस कोसळण्याचा अंदाज असून, काही भागांत जोरदार सरींचाही अनुभव येऊ शकतो. पावसाच्या या मालिकेमुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

आयसीसी ग्लोबल बिझनेस समिट 2025 चा समारोप मुंबई: इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स (आयसीसी) ने त्यांच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून 'वन नेशन, मल्टीपल अपॉर्चुनिटीज' ...
मुंबई-कोकणात पावसाची धडक
महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढली असून, मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर अनुभवायला मिळत आहे. सध्या मुंबईत ढगाळ वातावरण असून, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभर आकाश ढगाळ राहणार आहे. मुंबईत काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, कोकण किनारपट्टीवर विशेषत: रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या मुसळधार पावसामुळे समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांना व मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पावसाचा धुमाकूळ
राज्यात पावसाचा जोर वाढत असून, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यात दिवसभर आकाश ढगाळ राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो. तर धुळे, नंदुरबार आणि जळगाव येथे विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. विदर्भातही पावसाची तीव्रता वाढणार असून, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या सततच्या पावसामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या असून, शहरी भागात वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.