दुबई: आशिया कप २०२५ च्या सुपर फोरमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) सलामीवीर फखर झमानच्या वादग्रस्त बाद निर्णयाबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) अधिकृत तक्रार दाखल केली आहे.
सामन्याच्या तिसऱ्या षटकात हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर फखर झमानने फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटच्या कडेला लागून यष्टिरक्षक संजू सॅमसनच्या हातात गेला. सॅमसनने पुढे झुकून हा झेल घेतला. ऑन-फिल्ड अंपायरने हा निर्णय तिसऱ्या अंपायरकडे सोपवला, कारण चेंडू जमिनीला लागून सॅमसनच्या हातात गेला की नाही, याबाबत संशय होता. अनेक रिप्ले आणि विविध कोनातून तपासणी केल्यानंतर तिसऱ्या अंपायरने फखरला बाद घोषित केले.
या निर्णयामुळे फखर झमान आणि पाकिस्तानचे संघ व्यवस्थापन दोघेही नाराज झाले. त्यांना असे वाटले की, चेंडू जमिनीला लागल्यानंतर सॅमसनच्या हातात गेला होता, त्यामुळे तो 'नाबाद' असायला हवा होता. पाकिस्तानच्या कर्णधार सलमान अली आगाने सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेतही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती.
मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीला पत्र लिहून तिसऱ्या अंपायरच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. पीसीबीच्या मते, तिसऱ्या अंपायरने उपलब्ध असलेल्या सर्व कोनांमधून तपासणी न करता घाईत निर्णय दिला. त्यांचा दावा आहे की, हा निर्णय चुकीचा होता आणि यामुळे सामन्यावर परिणाम झाला. पीसीबीने यापूर्वीही आशिया कपमधील 'हँडशेक' न केल्याच्या मुद्द्यावरून आयसीसीकडे तक्रार केली होती.