
एक ग्रॅम मोफत सोन्याची जाहिरात अंगलट; साताऱ्यात वाहतूक कोंडीमुळे ज्वेलर्सवर गुन्हा दाखल
सातारा: सोशल मीडियावर केलेल्या एका जाहिरातीमुळे साताऱ्यातील एका ज्वेलर्स दुकानदाराला मोठा फटका बसला आहे. एका ग्रॅम मोफत ज्वेलरीच्या ऑफरमुळे महिलांची दुकानासमोर प्रचंड गर्दी जमली आणि वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने साताऱ्यातील दुकान मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय होती ती ऑफर?
साताऱ्यातील गुरुवार पेठ परिसरातील एका ज्वेलर्सने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियावर एक अनोखी जाहिरात केली होती. 'इन्स्टाग्रामवर दुकानाच्या पेजला फॉलो करा, जाहिरातीची इमेज तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करा आणि ५० व्ह्यूज मिळाल्यास एका ग्रॅमची मोफत फार्मिंग ज्वेलरी मिळवा,' अशी ऑफर पहिल्या १००० महिलांसाठी देण्यात आली होती.

या ऑफरची माहिती शहरात पसरताच दुकानासमोर महिलांची मोठी गर्दी झाली. दुकानासमोर गर्दी झाल्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना पोलिसांना न दिल्याने सातारा शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
दुकान मालकावर गुन्हा दाखल
या प्रकरणात पोलीस प्रशासनाला कोणतीही माहिती न देता रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण केल्याच्या आरोपावरून दुकान मालकासह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात कोणत्याही महिलेने फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केलेली नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
सध्या सोशल मीडियावर केलेल्या या जाहिरातीची आणि त्यानंतर झालेल्या कारवाईची चर्चा शहरात जोरदार सुरू आहे.