
चित्तोडगड : राजस्थानमधील चित्तोडगडमध्ये पोलिसांनी एका टोळीला पकडले आहे. या टोळीच्या सदस्यांनी ChatGPT वापरुन ५०० च्या शेकडो बनावट नोटा छापून घेतल्याचे सांगितले. ज्या भागात कोणी ओळखत नाही त्याच भागात जायचे, जाताना शक्यतो बनावट नंबरप्लेटची दुचाकी घेऊन जायचे. डोक्यावर टोपी घालून चेहरा कमीत कमी दिसेल याची काळजी घेत बनावट नोटा बाजारात खपवायच्या असा उद्योग टोळीचे सदस्य करत होते. शक्यतो दूध डेअरी, मिठाईचे दुकान, खाण्यापिण्याचे पदार्थ विकणाऱ्याचे दुकान अशा ठिकाणी थोडी खरेदी करुन थेट ५०० ची नोट द्यायची. दुकानदाराकडून सुटे पैसे घ्यायचे आणि लगेच घटनास्थळावरुन दूर निघून जायचे असे प्रकार टोळीचे सदस्य करत होते. या पद्धतीने टप्प्याटप्प्याने त्यांनी अनेक बनावट नोटा बाजारात खपवल्या होत्या.
सुरुवातीला बनावट नोटा देऊन तरुणांनी केलेली फसवणूक कोणाच्या लक्षात आली नाही. पण एका व्यक्तीने बँकेत रोख रक्कम जमा करण्यासाठी नेली त्यावेळी कोरी करकरीत नोट बनावट म्हणून बँकेच्या यंत्राने बाजुला फेकली. ही नोट थोड्या वेळापूर्वीच एका तरुणाने दिली होती त्यामुळे व्यापाऱ्याला ते आठवले. नुकसान झाले म्हणून बँकेतील अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने संबंधित व्यापाऱ्याने पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी बाजारात लक्ष ठेवण्यासाठी खबरी नेमले. खबऱ्यांनी दिलेल्या माहितीआधारे एक दिवस पोलिसांनी सापळा रचून आसिफ अली, आदिल खान आणि शाहनवाज खान या तिघांना पकडले. चित्तोडगड पोलिसांनी पकडलेल्या तिघांकडून ५०० रुपयांच्या ३० बनावट नोटा जप्त केल्या. सर्व नोटा एकाच मालिकेतील होत्या. यानंतर तरुणांची कसून चौकशी करण्यात आली. एवढ्या बनावट नोटा कुठुन आणल्या ? हा प्रश्न तरुणांना विचारण्यात आला. अखेर तरुणांनी ChatGPT वापरुन ५०० च्या शेकडो बनावट नोटा छापून घेतल्याचे सांगितले. तरुणांनी कबुली देताच पोलिसांना धक्का बसला. एआयचा वापर बनावट नोटांच्या छपाईसाठी करणे शक्य आहे याची जाणीव होताच पोलिसांना मोठा धोका लक्षात आला. घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनात तरुणांची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीत तरुणांनी ChatGPT वापरुन बनावट नोटा बनवण्याचे तंत्र ऑनलाईन शिकून घेतल्याची कबुली दिली. रॅकेटचा सूत्रधार आसिफ अली याने सांगितले की, त्याने ChatGPT तसेच विविध AI प्लॅटफॉर्मचा वापर करुन बनावट नोटा छापण्याचे तंत्र अवगत केले. यानंतर अनेक व्हिडीओ बघून आणि ऑनलाईन माहिती वाचून बनावट नोटा छापण्यासाठी विशिष्ट कागद, शाई, रसायने ऑनलाईन मागवली. सगळे साहित्य वापरुन बनावट नोटा छापल्या. या नोटा डोळ्यांनी बघितल्यास बनावट असल्याचे लगेच कळत नाही पण बँकांची यंत्र या नोटा ओळखून वेगळ्या करू शकतात. यामुळेच बनावट नोटा खपवणे काही दिवस सहज शक्य झाले.
तरुणांनी झालावाड जिल्ह्यातील सारोला गावात एक खोली भाड्याने घेतली. याच खोलीत त्यांचा बनावट नोटांचा कारखाना होता. पोलिसांनी धाड टाकून खोली सील केली. खोलीतून पोलिसांनी एक प्रिंटर, विशेष कागद, शाई, रसायने, हिरवी टेप, साचे आणि वॉटरमार्क तयार करण्यासाठी वापरली जाणारी एक लाकडी चौकट जप्त केली. या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.