
नाशिक : नाशिक मध्य मतदारसंघाच्या आमदार सौ. देवयानी फरांदे यांनी मुख्यमंत्री . देवेंद्र फडणवीस तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना निवेदन देऊन स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लंडनमध्ये वास्तव केलेले निवासस्थान महाराष्ट्र शासनाने खरेदी करून तेथे “स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक” उभारावे, अशी मागणी केली आहे.
फरांदे यांनी निवेदनात म्हटले आहे की, “स्वातंत्र्यवीर सावरकरांचे लंडनमधील वास्तव्य भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पा आहे. त्या वास्तूस ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. लंडनमधील भारतीय नागरिक या ठिकाणी स्मारक व्हावे, अशी सातत्याने मागणी करीत आहेत. त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचा वारसा जागतिक स्तरावर अधोरेखित करण्यासाठी या वास्तूवर राष्ट्रीय स्मारक उभारणे आवश्यक आहे.”
या संदर्भात मुख्यमंत्री व सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी तातडीने पावले उचलून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी विनंतीही आमदार फरांदे यांनी केली आहे.
याबाबत तत्काळ कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी अतिरिक्त मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य महाराष्ट्र शासन यांना दिलेले आहे.