Tuesday, September 23, 2025

क्रिकेटपटू युवराज सिंग ED च्या कार्यालयात

क्रिकेटपटू युवराज सिंग ED च्या कार्यालयात

नवी दिल्ली : माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग सक्तवसुली संचालनालयाच्या (Enforcement Directorate / ED) कार्यालयात पोहोचला आहे. ऑनलाईन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात ईडीच्या चौकशीला सामोरा जाण्यासाठी युवराज हजर झाला आहे. याआधी सोमवारी ईडीने माजी भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाची आठ तासांहून अधिक काळ चौकशी केली होती.

ऑनलाईन बेटिंग अ‍ॅप 'वनएक्सबेट'शी संबंधित मनी लाँड्रिंग अर्थात आर्थिक अफरातफर किंवा आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात रॉबिन उथप्पाची साक्ष पोलिसांनी नोंदवून घेतली आहे. रॉबिन उथप्पा सोमवारी सकाळी ११ वाजता ईडीच्या कार्यालयात पोहोचला होता आणि संध्याकाळी साडेसात वाजता साक्ष नोंदवून निघून गेला होता. आता युवराजची चौकशी किती वेळ चालणार ? याकडे अनेकांचे लक्ष आहे.

भारतात बेटिंग अ‍ॅपवर बंदी आहे. विविध अ‍ॅपद्वारे झालेल्या आर्थिक अफरातफरीची चौकशी सुरू आहे. रॉबिन उथप्पा आणि युवराजची चौकशी ही या प्रक्रियेचा एक भाग आहेत. रॉबिन उथप्पा, युवराज सिंग, शिखर धवन, हरभजन सिंग, सुरेश रैना, सोनू सूद या सर्वांवर ईडीने ऑनलाईन बेटिंग अ‍ॅप 'वनएक्सबेट'चे प्रमोशन केल्याचा आरोप केला आहे. टप्प्याटप्प्याने सर्वांचीच चौकशी सुरू आहे.

ईडीने काही दिवसांपूर्वीच माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांची चौकशी केली. अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदार मिमी चक्रवर्ती आणि बंगाली अभिनेता अंकुश हाजरा यांचीही चौकशी करण्यात आली होती. सोमवारी रॉबिन उथप्पाची चौकशी झाली. ईडीने माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि अभिनेता सोनू सूद यांनाही याच प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावले. युवराज चौकशीसाठी हजर झाला आहे. सोनू सूदला २४ सप्टेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले जाईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >