
शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत
मुंबई : २४ सप्टेंबरला बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असून २८ तारखेपर्यंत तो राज्यात येण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या आठवड्यात पाऊस परत सक्रिय होणार आहे, ज्यामुळे किमान ३० सप्टेंबरपर्यंत तरी राज्यातून पाऊस निरोप घेण्याची शक्यता नाही. सध्याच्या हवामानाच्या अंदाजानुसार २२ ते २५ सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये मेघ गर्जनेसह वादळी पाऊस अपेक्षित आहे, जो प्रामुख्याने दुपारनंतर पडेल. कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव २६ तारखेपासून जाणवण्याची शक्यता आहे. यादिवशी विदर्भ आणि मराठवाड्यातील पूर्व आणि दक्षिणेकडे असलेल्या भागांमध्ये दुपारनंतर पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. २७ तारखेला विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसात वाढ होऊ शकते, आणि यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊसदेखील पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. २८ तारखेला राज्यातील पश्चिम भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहू शकतो.
शेतकऱ्यांनी हवामानाच्या या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करावे. काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावीत, असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.