
सदावर्तेंच्या गाडीवर मराठा आंदोलकांचा हल्ला
धनगर आरक्षणासाठी उपोषणस्थळी जात असताना घडली घटना
जालना (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाला सातत्याने विरोध करणारे आणि मनोज जरांगे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेणारे अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर जालन्यात मराठा आंदोलकांनी हल्ला केल्याचा प्रकार रविवारी घडला.
सदावर्ते हे रविवारी जालना येथील धनगर उपोषण आंदोलनाला भेट जाण्यासाठी जात होते. त्यांच्या गाड्यांचा ताफा रस्त्यावरुन जात असताना पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. यावेळी मराठा आंदोलक रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. याठिकाणी पोलीस बंदोबस्त होता. आंदोलकांना पाहून पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले होते. यानंतर आंदोलक गाडीवर धावून जातील, असे पोलिसांना वाटले नव्हते. एके ठिकाणी आंदोलकांनी पोलिसांना चुकवून सदावर्ते यांची गाडी गाठण्यात यश मिळवले. या आंदोलकांनी सदावर्ते यांच्या लिमोझिन गाडीवर धावून जात काचेवर फटके मारले.
मुंबईतही गाडीच्या काचा फोडल्या होत्या : यापूर्वी जरांगे अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले असताना काही मराठा आंदोलकांनी सदावर्ते यांच्या मुंबईतील घराबाहेर असणाऱ्या गाडीच्या काचा फोडल्या होत्या. त्यानंतर मराठा आंदोलकांकडून सदावर्ते यांना अनेकदा इशारेही देण्यात आले होते. मात्र, सदावर्ते यांनी जरांगे यांच्या भूमिकेला विरोध करणे सुरूच ठेवले होते.