दुरवस्था उड्डाणपुलांची, कोंडी मुंबईकरांची

गेल्याच आठवड्यात मुंबईतील एक महत्त्वाचा उड्डाणपूल बंद झाला. हा पूल बंद झाल्यामुळे मुंबईकरांच्या त्रासात आणखी एक भर पडली आहे. एकीकडे मुंबईत वाहनांची संख्या मागील पाच वर्षांत दहा पटीने वाढत आहे. तर दुसरीकडे पायाभूत सुविधांसाठी, विकासकामांसाठी मेट्रोच्या कामांसाठी रस्ते खोदून ठेवल्याने तर काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडल्याने मुंबईतल्या अनेक ठिकाणांवरची वाहतूक कासवगतीने सुरू आहे. मुंबईतल्या अनेक मार्गांवर वाहतूक कोंडीची बेटे तयार झाली आहेत. त्यात आता जुने ब्रिटिशकालीन उड्डाणपूल धोकादायक ठरत असल्याने एकेक करून बंद करावे लागत असल्याने मुंबईकरांची दिवसेंदिवस आणखीनच कोंडी वाढत आहे. या वाहतूक कोंडीचा त्रास कमी करण्यासाठी देशातल्या आर्थिक राजधानीत वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्याची गरज नसून आता एक व्यापक इलाजाची गरज निर्माण झाली आहे. यात पुलांची कोंडी होत नसून मुंबईकरांची कोंडी होत आहे.


यापूर्वीच मुंबईतील असंख्य उड्डाणपूल दुरुस्ती करता अथवा पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत. त्यात घाटकोपर लक्ष्मीनाला पूल. मुंबई सेंट्रल स्थानकाबाहेरील बेलासिस पूल, मुख्य वर्दळीचा सायनचा पूल, ओशिवरा पूल असे असंख्य पूल बंद झाल्यामुळे सर्वत्र वाहतूक कोंडी होत आहे. हे उड्डाणपूल बंद झाल्याने त्याचा फटका दुसऱ्या उड्डाणपुलांना बसत आहे आणि तेथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. मुंबईकर आधीच या खूप मोठ्या वाहतूक कोंडीमुळे अस्वस्थ झाला आहे. एमएमआर विभागात म्हणजेच नियोजन न करता बांधत गेलेल्या महानगरात म्हणजेच ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेलसारख्या भागात तर अत्यंत दयनीय अवस्था आहे. मुंबई शहरातील असे असंख्य उड्डाणपूल बंद झाल्याने त्याचा फटका रोज कामावर ये-जा करणाऱ्या नोकरदार वर्गाला तसेच शाळा, रुग्णवाहिका यांनाही बसत आहे. ही वाहतूक कोंडी मुंबईकरांच्या नशिबी होती त्यातच मुंबईतील जीवनवाहिनी म्हणजे रेल्वेच्या रोज बिघडत चाललेल्या वेळापत्रकामुळे मुंबईकर चाकरमानी अक्षरशः पिचून गेले आहेत. दर रविवारी मेगाब्लॉक घेऊनही दररोज उशिरा चालणाऱ्या रेल्वे गाड्या त्यामुळे लेटमार्क मुंबईकरांच्या पाचवीलाच पूजले आहे. त्यातच रेल्वे गाड्यांमध्ये होणारी प्रचंड गर्दी, त्यातून वाट काढून रस्त्यावर आले तर वाहतुकीची कोंडी यामुळे मुंबईकर अक्षरशः थकून गेला आहे. आता पावसाचा मुक्काम तर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यात एक दिवस कधीतरी इतका पाऊस पडतो की मुंबईकरांना अक्षरशः ठप्प करून सोडतो. रस्त्यावरील चिखल, फेरीवाले त्यात पावसामुळे होणारे खड्डे तसेच पावसाळी आजारांनी तर मुंबईकरांची कधीच पाठ सोडली नाही. अशातच मुंबईकरांना रोज साधारण दोन ते अडीच तास वाहतूक कोंडीत घालवावे लागत आहेत. वाहतूक कोंडीत सगळेच मुंबईकर अडकले आहेत. चाकरमानीही आणि उच्चभ्रुही. त्यात कधी मेट्रो रुसून बसते, तर भार सहन न झाल्यामुळे मोनोरेल बंद पडत आहे. कधी रिक्षावाला नकार देतात तर कधी टॅक्सीवाले उर्मट वागतात. सध्या मेट्रो प्रवाशांच्या पसंतीस उतरू लागली आहे. मात्र मेट्रो पकडायला जाण्यासाठीही द्राविडी प्राणायामच करावा लागतो. त्यानंतर पुन्हा त्या मेट्रोतून उतरून आपल्या स्थळी जाणे. हेही एक मुंबईकरांपुढे मोठे दिव्यच आहे. मुंबईतील दिवसेंदिवस वाढत जाणारे लोंढे काही कमी होत नाही व्यापार संकुलेही विभागली तरी परिस्थिती ‘जैसे थे’च राहते. कोणतेही नियोजन न करता मुंबईचा आडवा उभा विकास सुरू आहे मात्र सध्या सरकारी धोरणाप्रमाणे इतर सर्व बाबी दुर्लक्षून ‘मेट्रो एके मेट्रो’ असा जयघोष सुरू आहे. मात्र त्या मेट्रोला ही मर्यादा आहेत हे विसरून चालणार नाही.


मुंबईच्या बेस्ट सेवेची वाताहत पाहिली तर आपण कुठे चाललो आहोत याचा प्रश्न पडतो. कोणे एकेकाळी रेल्वेनंतर बेस्ट बससेवा हा शेवटच्या टोकापर्यंत जाणाऱ्या प्रवाशांना मोठा आधार होता. रस्त्यावरील वाहतूकही कमी असल्यामुळे बेस्ट बस अगदी वेळेचे तंतोतंत पालन करून चालवली जात असे. मात्र गेल्या काही वर्षांत बेस्ट प्रशासनाकडे झालेले सरकारचे पूर्णतः दुर्लक्ष यामुळे या चांगल्या सेवेला घरघर लागली. आज कमी होत गेलेली बेस्ट बसची संख्या व खासगीकरणाने दर्जा व प्रतिष्ठा गमावून बसलेली बससेवा पाहिली तर, एक दर्जेदार सेवेचे झालेले वाटोळे पाहून जुने प्रवासी दु:खी होतात. आज बेस्ट बसचे भाडे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने लाखो लोकांनी आज बेस्ट बसचा पर्याय सोडून दिला आहे.


कोरोना काळात, बेस्ट बस तसेच रेल्वेने प्रवास नव्हता म्हणून कित्येकांनी दुचाकी खरेदी केल्या. मुंबईच्या रस्त्यांवर दुचाकींचा सुळसुळाट दिसून येतो. पण त्यांचे रस्त्यावरील बेशिस्तपणे चालवणे पाहून आता कोणीतरी या दुचाकीस्वारांना आवरा म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे. मात्र सार्वजनिक सेवांना प्राधान्य न देता खासगी गाड्यांना प्राधान्य दिले की शहराचे गणित बिघडते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुंबई शहर आहे.


दक्षिण मुंबईत येण्यासाठी पूर्व मुक्त मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग व आता छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्गे विनाअडथळ्यांनी शहरात येता येते. मात्र ते शेवटी संपतात मुंबई शहरातच... त्यामुळे मुंबई शहरात म्हणजेच दक्षिण मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे आढळते. म्हणजे यातही कोणतेही नियोजन न करता एका शहराची विपन्नावस्थाच झालेली दिसून येते. वाहतूक कोंडी तर पाचवीला पूजलेली आहेच, आता यात मुंबईतील महत्त्वाचे उड्डाणपूल बंद झाल्याने ही कोंडी उड्डाणपुलांची नसून ही कोंडी आता खऱ्या अर्थाने मुंबईकरांची झाली आहे.


- अल्पेश म्हात्रे

Comments
Add Comment

निकोबार द्वीप समूहाचा व्यूहात्मक विकास

केंद्र सरकारने अंदमान निकोबार बेट समूहाचा विकास करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. या बेटाचे भौगोलिक स्थान लक्षात

बालेकिल्लाही भाजप विचारांचा होतोय

तरुण मतदारांच्या अपेक्षा रोजगार, शिक्षण व उद्योजकतेशी निगडित आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी अजूनही पारंपरिक

विद्युत वाहनांस प्रोत्साहन

मुंबईतील सूक्ष्मकण प्रदूषण (पीएम २.५ आणि पीएम १०) हा वायू प्रदूषणाचा मुख्य घटक आहे, जो सार्वजनिक आरोग्यासाठी

विद्यार्थ्यांची प्रगती कशी होणार?

विद्यार्थ्यांची प्रगती होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेऊन अध्यापकांनी योग्य मार्गदर्शन करणे

नव्या दोस्तीची अमेरिकेला धास्ती

प्रा. जयसिंग यादव डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ नीतीमुळे चीन, भारत, रशिया अमेरिकेची व्यूहनीती झुगारून एकत्र आले.

चौकटीपलीकडचा शिक्षकी पेशा...

आधुनिक युगात शिक्षकांची भूमिका अधिक आव्हानात्मक झाली आहे. सध्याच्या तंत्रबदलत्या युगात शिक्षणाच्या कल्पना