मुंबई : 'कांतारा' या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. केवळ कन्नड भाषेतच नव्हे, तर हिंदी, तेलुगू आणि तमिळमध्येही या चित्रपटाने मोठे यश मिळवले. या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी रिषब शेट्टीला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. याच यशानंतर निर्मात्यांनी याचा पुढील भाग तयार करण्याचा निर्णय घेतला असून 'कांतारा: चॅप्टर १' हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज आहे.
या चित्रपटात रिषब शेट्टीसोबत अभिनेत्री रुक्मिणी वसंत झळकणार आहे. ती 'कनकावती' ही भूमिका साकारत आहे. रुक्मिणीने २०१९ मध्ये अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले असून कमी वेळातच तिचा अभिनय गाजू लागला आहे. ती आता यशच्या 'टॉक्सिक' आणि प्रशांत नील व ज्युनियर एनटीआर यांच्या 'ड्रॅगन'मध्येही मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
'कांतारा चॅप्टर १' हा मूळ 'कांतारा'चा प्रीक्वेल आहे. या भागात 'भूत कोला' परंपरेचा उगम, जंगलातील गूढ, आदिवासी जीवन आणि एका राजाचे शोषण याभोवती कथा फिरते. चित्रपटाचे संगीत बी. अजनीश लोकनाथ यांनी दिले आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून तो सोशल मीडियावर चांगलाच गाजतो आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता अजून वाढली आहे.
'कांतारा चॅप्टर १' हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२५, म्हणजेच दसरा आणि गांधी जयंतीच्या दिवशी, प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, 'कांतारा'चा पहिला भाग अवघ्या १६ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता आणि त्याने जगभरात तब्बल ४५० कोटींहून अधिक कमाई केली होती.
आता या प्रीक्वेलकडूनही तितकीच अपेक्षा ठेवली जात आहे, आणि ट्रेलर पाहता, प्रेक्षक पुन्हा एकदा जंगलाच्या त्या गूढ जगात हरवून जाणार, यात शंका नाही.