हा वाद भारतीय डावाच्या पाचव्या षटकात घडला. हरिस रौफ गोलंदाजी करत असताना अभिषेक शर्माने त्याला चांगलीच धुलाई केली. रौफने टाकलेल्या एका चेंडूवर शुबमन गिलने चौकार मारल्यानंतर हरिस रौफ चिडला आणि तो काहीतरी बोलू लागला. हे पाहून नॉन-स्ट्रायकर असलेल्या अभिषेक शर्माने त्याला सडेतोड उत्तर दिले.
दोघेही एकमेकांच्या समोर आले आणि त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. अभिषेक रौफला डिवचले, तर रौफही आक्रमकपणे त्याच्या दिशेने धावत आला. परिस्थिती चिघळत असल्याचं पाहून पंचांनी त्वरित मध्यस्थी केली आणि दोघांना वेगळे केले. त्यानंतरच हा वाद शांत झाला.
त्याआधी डावाच्या तिसऱ्या षटकांत शाहीन आफ्रिदी आणि शुभमन गिल यांच्यातही तणाव पाहायला मिळाला होता. त्याच षटकात शुभमनने दोन चौकार मारले.
सामना संपल्यानंतर अभिषेक शर्माने या घटनेबद्दल प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, "कोणत्याही कारणाशिवाय ते ज्या पद्धतीने आमच्याशी बोलत होते, ते मला आवडले नाही. त्यांना उत्तर देण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आक्रमक फलंदाजी. तेच मी केलं."
या सामन्यात अभिषेकने केवळ २४ चेंडूत अर्धशतक झळकावून युवराज सिंगचा १३ वर्षांचा विक्रम मोडला होता. अभिषेकच्या या खेळीने भारतीय संघाच्या विजयाचा पाया रचला. मात्र, मैदानावर घडलेल्या या वादानंतर दोन्ही संघांमधील तणाव पुन्हा एकदा समोर आला आहे.