
रायगड : नेरळ ग्रामपंचायतीने माथेरानकडे येणाऱ्या पर्यटकांकडून ‘स्वच्छता कर’ आकारण्याचा निर्णय घेतला असून, ग्रामसभेत एकमताने यास मान्यता देण्यात आली आहे. वाढत्या प्लास्टिक कचऱ्यामुळे परिसर अस्वच्छ होत असून, ग्रामपंचायतीवर स्वच्छतेचा आर्थिक बोजा वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
माथेरानकडे जाण्यासाठी नेरळ हे मुख्य प्रवेशद्वार आहे. येथून रस्ता आणि रेल्वेमार्ग दोन्ही मार्गांनी पर्यटक माथेरानमध्ये जातात. हे पर्यटक प्रवासादरम्यान सोबत घेतलेल्या प्लास्टिक वस्तू, रेनकोट, खाण्यापिण्याच्या वस्तूंचे रॅपर्स इ. टाकाऊ साहित्य परतीच्या प्रवासात नेरळ परिसरात फेकून देतात. परिणामी नेरळ ग्रामपंचायतीच्या स्वच्छता विभागावर अतिरिक्त ताण येत असून, कामगारही वाढवावे लागत आहेत.
ग्रामसभेत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. ग्रामपंचायत प्रशासक व ग्रामसभा अध्यक्ष सुजित धनगर यांनी हुतात्मा चौक येथे कर संकलन केंद्र सुरू करण्याची सूचना केली. नेरळ-माथेरान टॅक्सी चालक व मालक संघटनांशी याबाबत चर्चा झाली असून, त्यांनी सहकार्य करण्याचे संकेत दिले आहेत.या उपक्रमातून नेरळ ग्रामपंचायतीला वर्षाला एक कोटी रुपयांपर्यंत महसूल मिळू शकतो, असा अंदाज आहे. हा निधी स्वच्छता व्यवस्थापन, कचरापेट्या, जनजागृती फलक, प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया यासाठी वापरण्यात येणार आहे.नेरळ स्टेशन, हुतात्मा चौक आणि वाहन पार्किंग परिसर हे सर्वाधिक कचरा साचणारे भाग असून, या ठिकाणी विशेष लक्ष देण्यात येणार आहे. पर्यावरण रक्षणासाठी आणि पर्यटनामुळे होणाऱ्या नकारात्मक परिणामांना आळा घालण्यासाठी हा निर्णय एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे.