
मुंबई : फास्टेस्ट मॅन ऑन अर्थ अशी ओळख असणारा जमैकाचा दिग्गज धावपटू उसेन बोल्ट १ ऑक्टोबर रोजी प्रदर्शनीय फुटबॉल सामना खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. महान खेळाडूंपैकी एक आणि आठ ऑलिंपिक सुवर्णपदके जिंकणारा बोल्ट, दिग्गज फुटबॉलपटू, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि इतर प्रमुख व्यक्तींसोबत हा फुटबॉल सामना खेळणार आहे.
उसेन बोल्ट बंगळुरू एफसी आणि मुंबई सिटी एफसी या दोन्ही संघांकून एकेक हाफमध्ये खेळणार आहे. ३० सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या पुमाच्या दोन दिवसीय उत्सवाचा भाग म्हणून तो भारतात येत आहे. हा सामना पाहण्यासाठी बोल्टच्या चाहत्यांना या सामन्यासाठी तिकिटे खरेदी करावी लागणार आहेत. पुमा इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक कार्तिक बालगोपालन म्हणाले, "आम्हाला विश्वास आहे की, खेळांमध्ये समुदायांना प्रेरणा देण्याची आणि एकत्र आणण्याची शक्ती आहे. फुटबॉल हा भारतीय तरुणांमध्ये सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. आणि आम्ही उसेन बोल्टला येथे फुटबॉल खेळण्यासाठी आमंत्रित करून हे साजरे करू इच्छित आहोत."
बोल्ट नेहमीच फुटबॉलबद्दल उत्साही राहिला आहे. अगदी ट्रॅकच्या बाहेरही. लहानपणी तो अनेकदा फुटबॉल खेळत असे आणि मैदानावर त्याचा वेग आणि कौशल्य दाखवण्याचे स्वप्न पाहत असे. ऍथलेटिक्समधून निवृत्त झाल्यानंतरही त्याने हा खेळ गांभीर्याने घेतला,प्रशिक्षण घेतले आणि प्रदर्शनीय सामने खेळले आणि गोलही केले आहेत. त्यामुळे आता भारतीय क्रीडा प्रेमींना फुटबॉलच्या मैदानावर उसेन बोल्टचा खेळ पाहण्याची नामी संधी मिळणार आहे.