Monday, September 22, 2025

अतिवृष्टीमुळे संगोबा गावातील शेतीचे मोठे नुकसान – गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा पाहणी दौरा

अतिवृष्टीमुळे संगोबा गावातील शेतीचे मोठे नुकसान – गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा पाहणी दौरा

सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संगोबा गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्यात जाऊन नुकसानग्रस्त झाली असून, यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली की, सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून, पूर्वीच्या पुरस्थितीचा विचार करता योग्य नुकसानभरपाई दिली जावी.

या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज संगोबा गावाला भेट देत नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि अधिकाऱ्यांकडून नुकसानाची संपूर्ण माहिती घेतली.

स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थांच्या माहितीनुसार, पावसाचे प्रमाण वाढल्यास परिसरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्री कदम यांनी यंत्रणेला तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले. जीवितहानी टाळण्यासाठी ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देशही दिले.

यावेळी गृहराज्यमंत्री कदम यांनी प्रशासनाला स्पष्टपणे सांगितले की, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित पूर्ण करावेत आणि त्यानुसार अहवाल शासनाकडे सादर करावा, जेणेकरून नुकसानभरपाई लवकर मिळू शकेल. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता बचावकार्य, वैद्यकीय सेवा आणि तात्पुरते निवास यासाठी स्वतंत्र पथक तयार ठेवण्याचेही आदेश त्यांनी दिले.

Comments
Add Comment