प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ
एका मराठी लेखासाठी हे इंग्रजी आणि हिंदीमिश्रित नाव कशासाठी? हा तुम्हाला प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे. पण त्याचे असे आहे की, ‘ये दिल मांगे मोर’ ही जी घोषणा आहे ती प्रचंड लोकप्रिय झालेली घोषणा आहे. पेप्सी या कोल्ड्रिंकच्या कंपनीने चक्क सचिन तेंडुलकर या सर्वांच्या लाडक्या क्रिकेटपटूला आणि त्या काळात गाजत असलेल्या अनेकांची ‘दिल की धडकन’ असलेल्या अभिनेत्याला म्हणजे शाहरुख खानला घेऊन जाहिरात केली होती. ही घोषणा इतकी प्रसिद्ध झाली की तरुणांमध्ये ती रूढ झाली. आजच्या भाषेत सांगायचं तर ती प्रचंड व्हायरल झाली.
‘ये दिल मांगे मोर’ नावाचा एक चित्रपट आणि टीव्ही मालिकाही पुढे प्रसिद्ध झाली आणि खूप गाजली. ही थोडीशी पार्श्वभूमी सांगून मी मुख्य विषयाकडे वळते. एखादा भिक्षुक किंवा गरजू गरीब बाई घरी आली आणि त्यांनी धान्याची मागणी केली तर ते सहसा नाकारले जात नाही, अशी आपली भारतीय परंपरा आहे. घरात जाऊन त्यांच्यासाठी धान्य आणले जाते. त्या क्षणी खरेच दान करावेसे वाटले आणि घरातून पाच किलो तांदळाने भरलेली बरणी एखाद्याने बाहेर आणली तर समोरच्या माणसाकडे जेमतेम एक किलो तांदूळ बसेल इतका छोटासा वाडगा दिसतो. ते भांडे शिगोशिग भरून निश्चितपणे तांदूळ दिला जातो आणि उर्वरित तांदूळ घरात येतो, हे साहजिकच आहे. म्हणजे एखाद्याच्या मनात जरी आणखी दान करायचे असले तरी घेणाऱ्याकडे त्या मापाचे भांडे, पिशवी असे काही नसते. दानशूर तरी काय करणार, बरोबर ना?
आता हे सांगितल्यावर तुम्ही म्हणाल की, घरातली पिशवी किंवा ती बरणीच त्या व्यक्तीला देऊ शकता... ! तर आपण इथे विनोद किंवा तर्कबुद्धी बाजूला ठेवून वरील प्रसंगातील मर्म लक्षात घेऊ या. प्रत्येक माणसाला आपण खूप ज्ञानी असल्यासारखे वाटते, त्या माणसाला खूप सारे ज्ञान समोरच्या माणसापर्यंत पोहोचवावे वाटते; परंतु समोरच्याच्या हातात किती मोठे भांडे आहे म्हणजेच ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता, इच्छा आणि वेळ आहे हे देणाऱ्यांनीही लक्षात घेतले पाहिजे! त्या पलीकडे आपण देत गेलो तर ते नक्कीच वाया जाते.
अगदी अलीकडचे उदाहरण घेतले तर माझ्याकडे एखादा ज्ञान देणारा व्हिडीओ आला जसे की रोजच्या वापरण्यातले घरातले पदार्थ घेऊन आपला आजार आपण कमी करू शकतो आणि खूप सारे पैसे वाचवू शकतो किंवा खुर्चीवर बसल्या बसल्या व्यायाम करून मोठ्या आजारांना दूर सारू शकतो वगैरे तर तो व्हिडीओ आपण ताबडतोब आपल्या नातेवाइकांना आणि मित्र परिवाराला पाठवतो जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा व्हावा. आता आपल्यापैकी प्रत्येकाने विचार करून मला सांगावे की अशा पाठवलेल्या व्हिडीओचा समोरचा माणूस कितपत उपयोग करून घेतो? बरं त्यांनी उपयोग करून घेतला आणि त्यांना फायदा झाला असा फीडबॅक किंवा प्रतिसाद म्हणू या तुम्हाला त्यांच्याकडून आजतागायत मिळालेला आहे का? म्हणजे तो व्हिडीओ पुढे पाठवण्यासाठी आपण जो काही आपल्या मोबाइलचा डेटा खर्च केला, वेळ खर्च केला त्याचा काही उपयोग झाला का, हा प्रश्नच आहे.
साधे फोनवर बोलतानासुद्धा आपल्या लक्षात यायला हवे की समोरच्या माणसाला आपल्या बोलण्यामध्ये कोणतेही सारथ्य नाही. तो फक्त ‘हो’ला ‘हो’ करत आहे किंवा प्रत्येक मुद्दा खोडून काढून काहीतरी वेगळे सांगायचा प्रयत्न करत आहे अशा वेळेस आपण सुज्ञासारखे आपले म्हणणे त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचे थांबवतो का? बोलता-बोलता तो सहज बोलतो की मला दुसरा कोणाचा तरी फोन येत आहे किंवा मला महत्त्वाचे काम आहे किंवा आपण या विषयावर नंतर बोलू या. हे जर तो सांगत असेल तर तो सज्जन माणूस आहे; परंतु जर त्या माणसाने सरळ फोन बंद केला आणि नंतर एसएमएस करून सांगितले की, तो रेंजबाहेर गेला किंवा आपण बोलत असताना त्याच्या फोनची बॅटरी संपली तर आपण काय ते समजून घ्यावे. आपल्याकडे कितीही ज्ञान असो; परंतु समोरच्याकडे जर ते घेण्याची वृत्ती नसेल, मानसिकता नसेल तसेच आवड, कुतूहल व रस नसेल तर कुठे थांबायचे हे आपल्याला कळले पाहिजे!
‘ये दिल मांगे मोर’ असा जेव्हा ज्ञानग्रहण करण्याच्या बाबतीत समोरच्याचा ग्रह असेल तरच ते ज्ञान आपण त्याला देत राहिले पाहिजे. देणाऱ्या आणि घेणाऱ्याचा आनंद एकत्रितपणे महत्त्वाचा आहे. आपल्याकडे एखादे कला कौशल्य आहे, आर्थिक व्यवहाराचे ज्ञान आहे, वकीलकीचे ज्ञान आहे, डॉक्टरकीचे ज्ञान आहे वा आणखी काही; तर ते वापरताना ज्याला हवे त्यालाच ते द्यावे. कदाचित म्हणूनच आजकाल व्हाॅट्सअॅप असो, फेसबुक असो किंवा आणखी काही. एका प्रकारच्या आवडीच्या माणसांचा गट तयार केला जातो आणि मग त्या गटामध्ये त्या समान आवडीच्या गोष्टी नियमितपणे शेअर केल्या जातात. त्या वाचताना त्या गटातील सगळ्यांना आनंद तर होतोच; परंतु अधिकचे ज्ञानही मिळते. त्याच्यावर अनेकजण आपल्या चांगल्या-वाईट प्रतिक्रिया टाकतात त्याचाही उपयोग आपले ज्ञान वाढवण्यासाठी त्या गटातील सगळ्यांना होतो. पण आपल्याला जे वाटते ते आपण दुसऱ्याकडे ढकलत राहिलो, तर त्याची फारशी प्रगती होते की नाही हे माहीत नाही; परंतु समोरच्या माणसाच्या मनातून आपण उतरत जातो आणि नकळतपणे व्हाॅट्सअॅप, फेसबुक किंवा कुठेही आपल्याला अनफ्रेंड, अनफोलो केले जाण्याची शक्यता वाढत जाते. त्यामुळे ‘ये दिल मांगे मोर’ हे लक्षात घेऊन आपले हात-पाय, आपले तोंड, आपले मन यांबरोबर आपल्या बुद्धीलाही कुठे आणि कधी लगाम घातला पाहिजे, हे मात्र आपल्याला कळलेच पाहिजे! ही पोस्ट वाचणाऱ्या अनेकांना ‘ये दिल मांगे मोर...’चा मथितार्थ लक्षात आला असेलच त्यामुळे मीही लेखणी थांबवते!