मुंबई : दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून चर्चा रंगलेली असतानाच या दोन्ही भावांमध्ये मुंबई आणि ठाणे महापालिकेसाठी अंडस्टँडींग झाल्याची माहिती मिळत आहे. ठाण्याच्या बालेकिल्ला हा एकनाथ शिंदे यांचा हाती पूर्णपणे असल्याने त्याठिकाणी उद्धव ठाकरे यांना आपला निभाव लागणार नसल्याची कल्पना आल्याने या महापालिकेची जबाबदारी मनसेचे राज ठाकरे यांच्याकडे सोपवण्याचा निर्धार केला. ठाण्याची जबाबदारी राज ठाकरेंना आणि स्वत: मुंबईची कमान साधायचा निर्धार केल्याची माहिती मिळत आहे.
ठाणे महापालिकेतील शिवसेनेतील ६७ नगरसेवकांपैंकी ६६ माजी नगरसेवकांनी एकनाथ मुख्य नेता असलेल्या शिवसेनेत प्रवेश केल्याने आता ठाण्यात उबाठा शिवसेनेकडे एकमेव नगरसेवक शिल्लक राहिला आहे. तर कल्याण डोंबिबली महापालिकेत शिवसेनेचे ५७ नगरसेवक निवडून आले होते, पक्षफुटीनंतर उबाठा शिवसेनेकडे केवळ ९ माजी नगरसेवक असून उर्वरीत सर्व शिवसेनेकडे आहेत, तर ठाण्यात मनसेचा एकही नगरसेवक नसला तरी, तर कल्याण डोंबिविली महापालिकेत मनसेचे अपक्षासह १० नगरसेवक आहेत. त्यामुळे आगामी ठाणे, कल्याण डोंबिवली महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात त्यांना चारीमुंड्या चित करणे शक्य नसल्याने तसेच ठाण्यात गुंतून राहण्यापेक्षा मनसेला ठाण्याचे गाजर दाखवण्यात येत आहे.
विशेष म्हणजे या अंडस्टँडींगनंतरच राज ठाकरे यांनी शुक्रवारी अंबरनाथ, कल्याण डोंबिवलीचा दौरा केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये मनसे पक्ष हा ठाणे, कल्याण डोंबविलीमध्ये आक्रमक होताना दिसणार असून त्यांना उबाठा शिवसेनेची पूर्ण मदत पुरवली जाणार आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या महापालिका मनसेच्या पूर्ण ताकदीवर लढवून उबाठाचे काही नगरसेवक त्यांच्या पाठबळावर निवडून आणण्याचा विचार असल्याची माहिती मिळत आहे.
दुसरीकडे मुंबईत मनसेचा एकही माजी नगरसेवक नसून आजही सन २०१७च्या निवडणुकीत शिवसेनेचे निवडून आलेले आणि जातपडताळणीच्या अपात्रतेनंतर दुसऱ्या क्रमांकावर निवडून आलेल्या तसेच मनसेचे सहा नगरसेवक अशाप्रकारे ९९ माजी नगरसेवकांपैंकी सुमारे ५० नगरसेवक आजही उबाठा शिवसेनेकडे आहेत. त्यामुळे मुंबईत उबाठाची ताकद आजही काही प्रमाणात असल्याने मुंबई महापालिका राखण्याचा निर्धार उबाठा शिवसेनेने केला आहे. त्यामुळे मनसेच्या मदतीने काही नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा विचार असल्याने मुंबईचे मैदान मारण्यासाठी या महापालिकेची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी स्वत:वर घेतली आहे. यामुळे ठाणे, कल्याण डोंबिवलीमध्ये मनसे सर्वाधिक जागा लढवणार तर मुंबईत मनसेला काही जागा सोडून सर्वाधिक जागा उबाठा लढवेल अशाप्रकारची रणनीती आखली जात असल्याची माहिती मिळत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे कल्याण डोंबिवलीतील यश हे एकनाथ शिंदे यांच्यासाठी डॅमेज कंट्रोलमध्ये आणण्यासाठीचा हा प्रयत्न केला जात असला तरी नाशिक आणि इतर महापालिकेत निवडून येणाऱ्या जागांचा विचार करून समसमान जागांचा विचार करून वाटप करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहितीही मिळत आहे. त्यामुळे शिवसेनेत असताना मुंबई सोडून राज ठाकरेंवर जबाबदारी सोपवली होती, पण आता युतीतही राज ठाकरेंना मुंबईच्या बाहेरचा रस्ता दाखवून मुंबईत त्यांना थारा देणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.