
महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे
द्वापार युग सुरू होते. एकदा ब्रह्मदेवांना जांभई आली. तेव्हा त्यांच्या मुखातून एक पुरुष बाहेर पडला. त्याचा ताम्र वर्ण होता. त्याने ब्रह्मदेवासमोर उभे राहून हात जोडून नम्रपणे विचारले “ हे देवा! माझे नाव काय? मी कुठे राहू? काय खाऊ? याबद्दल मार्गदर्शन करावे. ब्रह्मदेवाने त्याची सुंदर अंग कांती पाहून त्याचे नाव सिंदूर ठेवले. तसेच त्याला तीनही लोकांत अपराजित राहण्याचा वर दिला. तो नम्रपणे ब्रह्मदेवासमोर उभा होता. ब्रह्मदेवाला त्याचा नम्रपणा पाहून अतिशय लोभ आला. त्यांनी त्याला तू रागाने ज्याला कवेत घेशील त्याचे शेकडो तुकडे होतील असे वरदान दिले. हे वरदान घेऊन तो पुरुष ब्रह्मदेवांना नमस्कार करून निघाला.
पुढे गेल्यानंतर त्याला वाटले की कोणतेही जप, ताप किंवा तपश्चर्या न करता ब्रह्मदेवाने आपल्याला एवढा मोठा वर दिला आहे हा खरोखरच वर आहे ही देवाने आपली समजूत काढून तसेच वाटेला लावले. म्हणून या वराची परीक्षा करण्यासाठी तो परत ब्रह्मदेवाकडे आला. त्याला परत आलेला पाहून ब्रह्मदेवाने त्याला कारण विचारले. तो म्हणाला आपण मला दिलेल्या वराची सत्यता पाहण्यासाठी मी परत आलो आहे व त्यासाठी मी आपणास कवेत घेण्याचा विचार करतोय. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले,
“अरे पुत्रा ! मी तुला जन्म दिलेला आहे आणि त्या वेळेला वर देताना तू अशा प्रकारचे वर्तन करशील याची मला अपेक्षा नव्हती. हे असुरी कृत्य असल्यामुळे तू असूर बनशील व भगवान गजाननाकडून तुला मृत्यू येईल असा शाप दिला. तरी पण तो सिंदुरासूर ब्रह्मदेवाच्या मागे लागला. ते पाहून ब्रह्मदेव त्या ठिकाणावरून पळून वैकुंठात विष्णूकडे गेले. त्यांना घाबरलेल्या अवस्थेत पाहून विष्णूने कारण विचारले. तेव्हा ब्रह्मदेवाने सविस्तर सांगितले. तोच सिंदुरासूर त्या ठिकाणी आला. विष्णूने त्याला समजाविले तेव्हा ब्रह्मदेवाला नाही तर मी तुम्हालाच कवेत घेतो असे सिंदुरासूराने विष्णूला म्हटले. विष्णू म्हणाले, अरे मी केवळ सत्वगुणी असून लोकपालनातच व्यस्त असल्यामुळे तू अशा प्रकारचे वर्तन माझ्याशी करू शकत नाही. त्यासाठी तू कैलास पर्वतावर महादेवाकडे जा ते पराक्रमी असून त्यांनी अनेक असुरांना ठार केले आहे. तेच तुझ्याशी लढण्यास समर्थ आहेत असा सल्ला त्यांनी दिला. सिंदुरासूर त्याप्रमाणे कैलास पर्वतावर महादेवाकडे गेला. त्यावेळेस महादेव ध्यानस्त होते. सिंदुरासुराचे लक्ष पार्वतीकडे गेले. तिच्याबद्दल आसक्ती निर्माण होऊन तो पार्वतीला पळवून नेऊ लागला. नंदी, भृंगी वगैरे गणाने त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता सिंदुरासुराने त्या सर्वांचा पराभव करून त्यांना पळवून लावले. तेव्हा नंदी वगैरे गणाने महादेवाकडे येऊन त्यांना घटनेची माहिती दिली. महादेव क्रोधायमान होऊन सिंदुरासुराच्या मागे धावले. त्याचवेळी पार्वती मातेने मयुरेश्वराचा धावा केला. तेव्हा बालकाच्या रूपात मयुरेश्वर त्या ठिकाणी प्रकट झाले, तोच महादेव त्या ठिकाणी आले व सिंदुरासुराला पार्वतीला सोडण्याबद्दल सांगू लागले. तेव्हा बालकरूपी मयुरेश्वराने सिंदुरासुराला म्हटले, तुम्ही महादेवाशी लढा तोपर्यंत मी पार्वती मातेला सांभाळतो. तुमच्यापैकी जो जिंकेल तो पार्वतीला नेईल असा सल्ला दिला. त्याप्रमाणे सिंदुरासूर पार्वतीला सोडून महादेवाशी युद्ध करण्यास सरसावला.
ज्या ज्या वेळेस तो महादेवाला कवेत घेण्याचा प्रयत्न करीत असे त्या त्या वेळेस बालकरूपी मयुरेश्वर अदृष्य रूपाने सिंदुरासुराच्या छातीवर परशूने वार करीत असे. असे अनेक वेळा झाल्याने सिंदुरासूर थकला तेव्हा शंकराने त्याला त्रिशूळाने छातीवर वार करून जखमी केले व तो जमिनीवर पडला. तेव्हा मयुरेश्वराने सिंदुरासुराला तुमचा पराभव झाल्याचे सांगून पार्वती मातेला शंकराकडे सोपवले. सिंदुरासुरानेही आपला पराभव मान्य करून पृथ्वीकडे प्रयाण केले. पार्वतीने त्या बालकाला तू कोण म्हणून विचारले असता ते बालक म्हणाले माते मी तुझाच पुत्र त्रेता युगातील गणेश मयुरेश्वर असल्याचे सांगितले. त्रेता युगात मी तुला दिलेल्या वचनाप्रमाणे तुझ्या भेटीला आलो आहे. तसेच सिंदुरासुराला मारण्यासाठी मी गजाननाच्या रूपात तुझा मुलगा म्हणून प्रगट होईल असेही सांगितले.
कालांतराने पार्वती गर्भवती असतांना महादेवांनी तिला पर्यन्तीच्या सुंदर वनात गणाच्या संरक्षणात ठेवून महादेव कैलास पर्वतावर आराधनेसाठी गेले. नऊ महिन्यानंतर पार्वतीसमोर साक्षात परमेश्वर गणेशाच्या चतुर्भुज रूपात प्रकट झाले. पार्वतीने कोण म्हणून विचारले. तेव्हा मी तुझाच पुत्र असून सिंदुरासुराला मारण्यासाठी गजानन अवतार घेत आहे. असे सांगून त्यांनी हत्तीचे तोंड असलेले चतुर्भुज रूप धारण केले. ते पाहून पार्वतीला वाईट वाटले; परंतु शंकराने तिला समजावले रूपाकडे न जाता गुणांकडे पाहण्यास सांगितले. पुढे गजाननने पराशर ऋषींच्या आश्रमात विद्या ग्रहण केली.
पराशरांच्या आश्रमात गजाननच्या कानी सिंदुरासुराच्या अत्याचाराच्या गोष्टी आल्यामुळे आता त्यांनी त्याच्या अत्याचारापासून सगळ्यांना मुक्त करण्याचा निश्चय केला व पराशर ऋषींना सांगितले. केवळ नऊ वर्षांच्या बालकाने अशा प्रकारचा निर्णय घेतल्याचे ऐकून पराशर ऋषींना आश्चर्य वाटले. ते म्हणाले,“अरे बालका सिंदुरासूर हा अतिशय पराक्रमी व क्रूर आहे. त्याच्या समोर तू बालक असून तुझा त्याच्यापुढे कसा निभाव लागेल.” परंतु परमपित्याचे प्रत्यक्ष रूप लक्षात घेताच ते समाधानी झाले.
पाराशर ऋषींची समजूत काढून बाल गजानन सिंदुरासुराच्या राजधानीकडे गेले. त्यांनी सिंदुरासुराला युद्धाचे आव्हान दिले. समोर नऊ वर्षांचा एक बालक पाहून सिंधुरासूर त्याला उपहासाने म्हणाला, “माझ्या पराक्रमाची तुला कल्पना नाही का? स्वतःचा जीव का धोक्यात घालतोस” तेव्हा बाल गजाननाने विशाल रूप धारण केले. त्यांचे मस्तक आभाळाला टेकले तर पावले पाताळत होती. त्याच्या भुजांचा अंतच लागत नव्हता. हे अवाढव्य रूप पाहून सिंदुरासूर घाबरला तरीही हिमतीने त्याने त्यांच्यावर वार केला. तेव्हा गजाननाने त्याचा गळा दाबून त्याला ठार केले व अशा प्रकारे संपूर्ण जनतेला तसेच त्रिलोकालाही सिंदुरासुराच्या त्रासातून वाचविले. असा उल्लेख गणेश पुराणात आहे.