Sunday, September 21, 2025

राहुरीत पोलिसांचा मोठा छापा : ३१ लाखांचे अवैध फटाके जप्त

राहुरीत पोलिसांचा मोठा छापा : ३१ लाखांचे अवैध फटाके जप्त

राहुरी : राहुरी तालुक्यातील चिंचोली गावात आज पोलिसांनी मोठी कारवाई करत विनापरवाना साठवून ठेवलेले फटाके जप्त केले आहेत. या छाप्यामध्ये तब्बल ३१ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई सुमित नंदकुमार रांका यांच्या मालकीच्या सुमित ट्रेडर्स या दुकानावर करण्यात आली असून, या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

फटाके बेकायदेशीरपणे साठवून ठेवल्याबाबत सुरज गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून राहुरी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. गुन्हा रजिस्टर नं. १०७४/२५ अन्वये भारतीय स्फोटक पदार्थ अधिनियम (बीएनएस ९ (ब)) अंतर्गत सुमित रांका (वय ३१, रा. चिंचोली) यांच्याविरोधात कारवाई झाली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ हे करत आहेत.

सध्या जिल्ह्यातील सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर फटाक्यांची विक्री वाढल्याचे दिसून येत आहे. यामुळे आग लागणे, अपघात होणे अशा घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण जिल्ह्यात तपासणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. परवाना नसलेल्या विक्रेत्यांविरुद्ध आणि सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे.

राहुरी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, फटाके खरेदी करताना अधिकृत परवानाधारक दुकानांमधूनच खरेदी करावी. कुठेही अवैध फटाक्यांचा साठा किंवा विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास, तातडीने पोलिसांना माहिती द्यावी.

या कारवाईनंतर जिल्ह्यातील इतर बेकायदेशीर विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, नियमभंग करणाऱ्यांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >