
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ५.०० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. यात ते अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण देशाच्या नजरा संध्याकाळी होणाऱ्या मोदींच्या भाषणावर आहे. यादरम्यान ते महत्वपूर्ण घोषणा देखील करू शकतात. ज्यात उद्यापासून लागू होणाऱ्या नवीन जीएसटी दराचा देखील समावेश असेल. तूर्तास, पंतप्रधान मोदींच्या भाषणाच्या विषयावर कोणतेही अधिकृत विधान अद्याप आलेले नाही.
नव्या जीएसटी दराबद्दल चर्चा
पंतप्रधानांच्या भाषणाच्या विषयाबाबत, मीडिया रिपोर्ट्समध्ये असा अंदाज लावला जात आहे की ते जीएसटी सुसूत्रीकरणावर चर्चा करू शकतात. मुळात उद्यापासून नवीन जीएसटी दर २.० देशात लागू होणार आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर मोदी जनतेला संबोधित करण्याची शक्यता आहे.
भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरील भाषणात घोषणा केली होती की, भावी जीएसटी सुसूत्रीकरणाचे नियम आणि दर दिवाळीपर्यंत लागू होतील. त्यानंतर, जीएसटी परिषदेच्या बैठकीत दोन जीएसटी दर (१२ आणि २८ टक्के) काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २३ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी शुल्क नियम लागू होणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी जाहीर केले होते. आज नवरात्रीच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांचे होणारे भाषण हे याच मुद्द्यावर असेल, असा अंदाज आहे. नवरात्रीच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांचे भाषण
उद्यापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. तर पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी जनतेला संबोधित करणार आहे. सध्या सणासुदीचा काळ असून या काळात अनेक वस्तूंची खरेदी केली जाते. त्यामुळे उद्यापासून लागू होणाऱ्या नव्या जीएसटी शुल्क दरानुसार काय महागणार आणि काय स्वस्त होणार? हे जाणून घेणे महत्वाचे ठरणार आहे. याच कारणामुळे मोदींचे आज नवरात्रीच्या पूर्वसंध्येला होणारे भाषण जनसामान्यांसाठी महत्वाचे ठरणार आहे.