देशभरात आनंदाने साजरा होणारा नवरात्रौत्सव उद्यापासून सुरू होणार आहे. देवीच्या आराधनेस समर्पित असलेल्या या नऊ दिवसांच्या उत्सवामध्ये उपवास, पूजा, नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विशेषतः गरबा आणि दांडिया नृत्य, मंदिरांमध्ये आणि घराघरांमध्ये देवीची पूजा, तसेच विविध ठिकाणी पारंपरिक कार्यक्रम यामुळे नवरात्रौत्सव सणाची रंगत वाढते. नवरात्रौत्सव हा सण केवळ धार्मिक नाही, तर तो एकतेचा, सहकार्याचा आणि महिला शक्तीचा उत्सव आहे.
घटस्थापना करतांना, देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते, विशेषतः देवी दुर्गेची. या दिवसांत, घरात सकारात्मक ऊर्जा, पवित्रता आणि समृद्धी येण्यासाठी देवीची उपासना केली जाते. घटस्थापना नंतर, पुढील नऊ दिवस देवीची पूजा-अर्चा आणि सेवा केली जाते. हा एक अत्यंत धार्मिक व भक्तिरुप समारंभ असतो, ज्यामुळे भक्तांना मानसिक आणि आध्यात्मिक शांती मिळते. नऊ दिवस उपवास देखील केला जातो.
घटस्थापनेचा योग्य मुहूर्त, विधि आणि घटस्थापना कशी करावी याची सविस्तर माहिती जाणून घ्या.
शुभ तिथी:
हिंदू पंचांगानुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी २२ सप्टेंबर (सोमवार) मध्यरात्री १ वाजून २३ मिनिटांनी प्रारंभ होईल आणि २३ सप्टेंबर (मंगळवार) रोजी २ वाजून ५५ मिनिटांनी संपेल. याच्या आधारे, हे दोन दिवस महत्त्वपूर्ण ठरतात, विशेषतः घटस्थापना आणि नवरात्रोत्सवासाठी.
घटस्थापनेचा शुभ मुहूर्त:
घटस्थापनेच्या पूजेचा शुभ मुहूर्त २२ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजून ९ मिनिटांनी सुरू होईल आणि सकाळी ८ वाजून ६ मिनिटांपर्यंत राहील. हा वेळ सर्वांत शुभ मानला जातो. याशिवाय, एक अभिजात मुहूर्तही आहे, जो २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजून ४९ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून ३८ मिनिटांपर्यंत असेल. या वेळेत घटस्थापना, देवीची पूजा किंवा घरातील इतर धार्मिक कार्ये केली जाऊ शकतात.
घटस्थापना कशी केली जाते?
अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्रौत्सव साजरा केला जातो. कुलदेवीची स्थापना यावेळी केली जाते. काही लोकं देवीची मूर्ती स्थापना करतात; तर काही जणांकडे कलश मांडतात, त्याला घटस्थापना म्हणतात. नऊ दिवस देवीपुढे तेल किंवा तुपाचा अखंड दीप प्रज्वलित केला जातो. देवीची त्रिकाल पूजा केली जाते. म्हणजे दिवसातून तीन वेळा पूजा केली जाते. दुपारच्या पूजेनंतर नऊ दिवस फुलांची माळ बांधली जाते.
नवरात्रौत्सवात, देवीच्या ९ रूपांची पूजा केली जाते, प्रत्येक दिवसाला एक विशिष्ट रूपाची पूजा केली जाते. भक्तजनांमध्ये पवित्र व्रत ठेवून तपश्चर्या केली जाते आणि त्यासाठी घरातील वातावरण पवित्र ठेवले जाते.
याव्यतिरिक्त, देवीची पूजा करणाऱ्या घरात रात्रभर जागरण-गोंधळ, भजन-कीर्तन, आणि विविध धार्मिक कृत्ये केली जातात, ज्यामुळे समृद्धी, आरोग्य आणि आनंद प्राप्त होतो.